पुणे

पुणे : बीडीपीतील बांधकामांवर पडणार हातोडा

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील डोंंगर माथा, डोंगर उतार आणि बीडीपी (जैवविविधता उद्यान) मधील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेकडून कारवाई केली जाणार आहे. या बांधकामांना नोटीस देऊन लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

डोंगर, टेकड्यांमध्ये बसलेले बशीच्या आकाराचे पुणे शहर आहे. त्यामुळे शहराला मोठी जैवविविधता लाभली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये शहराच्या आजूबाजूला असणार्‍या टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. शहरात बीडीपीचे क्षेत्र सुमारे 900 हेक्टर आहे. मात्र, त्यापैकी 600 हेक्टरवर अनधिकृत बांधकामे झालेली आहेत. बांधकाम विभाग मात्र अशी बांधकामे रोखण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे आता टेकड्या वाचविण्यासाठी बाधकामांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

काही दिवसांपूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली. बैठकीमध्ये टेकड्यांवरील अनधिकृत बांधकामे काढण्यात यावीत, अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार महापालिकेकडून अशा बांधकामांवर कारवाई करण्याचे नियोजन केले जात आहे.

पालकमंत्री यांच्या सूचनेनुसार बीडीपी आणि डोंगर माथा व डोंगर उतारावरील बांधकामांवर कारवाई करण्यात येणार आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून अनधिकृत बांधकामांना नोटीस बजाविण्यात येणार आहे. त्यानंतर कारवाई करण्यात येईल.

                             – विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

SCROLL FOR NEXT