पुणे

लक्ष्मी रस्त्यावरील इमारतीमध्ये पार्किंगच्या अतिक्रमणावर हातोडा; महापालिकेची कारवाई

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : इमारतीच्या टेरेसवरील (रुफ टॉप) अनधिकृत हॉटेलवर कारवाई सुरू असतानाच आता महापालिकेच्या बांधकाम विभागाने पार्किंगच्या जागेचा गैरवापर करणार्‍यांवरही कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाई अंतर्गत बुधवारी लक्ष्मी रस्त्यावरील एका नामांकित व्यावसायिक इमारतीमध्ये कारवाई करून चार हजार चौरस फूट जागा मोकळी केली.

महापालिकेने मागील पंधरा दिवसांत 'ट्युलिप इंजिनिअर्स' यांच्या साहाय्याने लक्ष्मी रस्त्यावरील सिटी पोस्ट चौक ते अलका टॉकीज चौकदरम्यानचे सर्वेक्षण केले, तसेच बेसमेंट, पार्किंगचा मान्य नकाशापेक्षा वेगळा वापर करणार्‍यांना नोटिसा बजावल्या. त्यानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाने एका नामांकित व्यावसायिक इमारतीमधील चार हजार चौरस फूट बांधकाम पाडले. या कारवाईत एक ब—ेकर आणि चार गॅस कटर आणि मोठ्या पोलिस बंदोबस्ताचा वापर करण्यात आला.

बांधकाम विकास विभागाचे अधीक्षक अभियंता सुधीर कदम, कार्यकारी अभियंता प्रवीण शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन 7 चे कनिष्ठ अभियंते, उपअभियंते, आरेखक सहायक यांच्या पथकाने कारवाई केली. दरम्यान, रुफ टॉपवर सुरू असलेल्या बेकायदेशीर हॉटेलवर कारवाई सुरू असून, नोटीस बजाविण्यात आलेल्यांपैकी 25 ठिकाणी कारवाई करून बांधकाम पाडण्यात आले आहे, ही कारवाई पुढेही चालू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

SCROLL FOR NEXT