पौड बसस्थानक परिसरातील अतिक्रमणांवर हातोडा Pudhari
पुणे

पौड बसस्थानक परिसरातील अतिक्रमणांवर हातोडा

अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईत सर्वाधिक मोठी कारवाई पौड येथे

पुढारी वृत्तसेवा

पौड: पौड (ता. मुळशी) येथील बसस्थानकाबाहेर असलेली अतिक्रमणे व पत्राशेड भुईसपाट करण्यात आली. पौड पोलिस, पुणे महानगर नियोजन महामंडळ, राज्य रस्ते विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ही संयुक्तपणे कारवाई करण्यात आली.

जिल्ह्यात सध्या सर्वत्र अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू आहे. चांदणी चौक ते पौड यादरम्यान अतिक्रमणे काढण्यासाठी सुरुवात दि. 1 मार्चपासून करण्यात आली आहे. पुणे ते दिघीबंदर महामार्गावरील भूगाव, भुकूम, पिरंगुट, घोटावडे फाटा, लवळे फाटा, शिंदेवाडी, सुतारवाडी अशी कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर पौड येथे देखील कारवाई करण्यात आली.

या ठिकाणी अरुंद रस्ता व झालेली अतिक्रमणे, यामुळे सतत वाहतूक कोंडी व्हायची. रस्त्यावरच दुकान लावण्यासाठी स्पर्धा लागली होती. त्यामुळे पादचार्‍यांना चालण्यासाठी जागाच शिल्लक नव्हती, तर आलेल्या ग्राहकांना देखील आपली वाहने उभी करायला जागा राहत नव्हती.

दर शनिवारी व रविवारी आलेल्या पर्यटकांनाही मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागायचा. परिणामी, 2 ते 3 किलोमीटरपर्यंत लांब रांगा वाहनांच्या लागायच्या. गेल्या 11 दिवसांत सुरू असलेल्या अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईत सर्वाधिक मोठी कारवाई पौड येथे झाली.

यात अनेक दुकानांवर जेसीबी चालविण्यात आला, तर काहींनी आपली अतिक्रमणे आधीच काढून घेतली होती. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष गिरिगोसावी, सहायक पोलिस उपनिरीक्षक सुधीर कदम, सुधीर घुले, बालाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

अनेक जण बेरोजगार

पौड बसस्थानक परिसरात अनेकांनी आपल्या उपजीविकेचे साधन म्हणून उदरनिर्वाहासाठी दुकाने थाटली होती. मात्र, या कारवाईने त्यांची दुकाने हटविली गेली असून, त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांचे दुसर्‍या जागेत स्थलांतरण होणे आवश्यक आहे.

पोलिस निरीक्षक ठाण मांडून

पौड बसस्थानक परिसरात अतिक्रमित दुकानांमुळे वाहतूक यंत्रणेवर ताण येतो. परिणामी, लांबच लांब वाहनांच्या रांगा लागतात. यातून पोलिस यंत्रणेला कोंडी फोडण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरिगोसावी हे अतिक्रमण कारवाईवेळी चौकत ठाण मांडून होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT