बेल्हे/खोडद : पुढारी वृत्तसेवा : निमगावसावा येथे वादळी वार्यासह झालेल्या गारपिटीने शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. निमगावसावा परिसरात शनिवारी (दि. 18) दुपारी दोनच्या सुमारास अचानक झालेल्या वादळी वारे व गारपिटीने काढणीला आलेली कलिंगड, कांदा, फुलशेती, कोबी, फ्लॉवर व डाळिंब आदींचे संपूर्ण नुकसान झाले आहे. पोटाला चिमटा काढून पिकवलेली पिके क्षणात जमीनदोस्त झाल्याने शेतकर्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे. कोरोना संकटातून शेतकरी बाहेर पडत असताना अचानक झालेल्या नुकसानीने शेतकरी पूर्ण अडचणीत सापडला आहे. शासनाने लवकरात लवकर मदतीचा हात देण्याबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे.
शेतकी धोरणात बदलाची गरज
निमगावसावा परिसरात शनिवारी झालेल्या वादळी वारे व गारपिटीत पिकांचे पूर्ण नुकसान झाले आहे. यापूर्वीही जुन्नर पूर्व भागात अनेकवेळा गारपिटीने नुकसान झाले. त्या वेळी भांडवली खर्च वसूल होईल इतकीही मदत न होता अगदी तुटपुंजी रक्कम मिळाली होती. वारंवार होणार्या संकटातून शेतकरीवर्गाला बाहेर काढायचे असेल तर शासनाने धोरण बदलण्याची गरज आहे. पिकांच्या भांडवली खर्चानुसार विमासंरक्षण व शाश्वत हमीभावाचे नियोजन केले, तरच शेतकरी जगू शकतो.
शनिवारी झालेल्या नुकसानीचे कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून शासनदरबारी सादर करावे. शासनानेही लक्ष घालून शेतकर्यांना किमान भांडवली खर्च द्यावा, अशी अपेक्षा आहे.
– पांडुरंग तुकाराम पवार, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, पुणे