पुणे

पुणे : बस थांब्यावर शेड काढल्याने हाल

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पीएमपी प्रशासनाकडून शहरातील ठिकठिकाणी असलेले बसस्टॉप काढण्याचे काम सुरू आहे. यामुळे प्रवाशांना उन्हातच उभे राहावे लागत असून, त्यांचे हाल होत आहेत. पीएमपीच्या ताफ्यात 2 हजार 142 बस आहेत. तर, शहरात सुमारे अडीच हजारांपर्यंत बसथांबे आहेत. काही ठिकाणी तर पीएमपीच्या बस थांबतात, मात्र अद्यापपर्यंत त्याठिकाणी पीएमपी प्रशासनाने शेडच उभारलेली नाही.

काही ठिकाणी तर पीएमपीच्या दोन-दोन शेड आहेत. यावरून पीएमपी प्रशासनाने थांबे उभारण्याबाबत अद्यापपर्यंत कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात आले नसल्याचे दिसते. तर, याउलट पीएमपी प्रशासनाने शहरातील विविध भागांत असलेल्या 6 शेड गेल्या दोन-तीन दिवसांत काढल्या आहेत. मात्र, त्या जागी कोणतेही नवीन शेड बसविलेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना उन्हातच बसची वाट पाहत उभे राहावे लागत आहे.

आतापर्यंत पीएमपीने काढलेल्या शेड : 6
पुणे हद्दीतील काढण्यात येणार्‍या शेड : 15
कॅन्टोंन्मेंट बोर्ड हद्दीतून काढण्यात येणार्‍या शेड : 15
एकूण काढण्यात येणार्‍या शेड : 30

आम्ही प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुणे पॅटर्न पद्धतीच्या जुन्या 15 वर्षांपुढील धोकादायक शेड हटविण्याचे काम हाती घेतले आहे. ते काढून त्यांच्या जागी दुसर्‍या शेड तातडीने उभारण्यात येतील. पुणे व कँन्टोंन्मेंट बोर्ड हद्दीतील शेड आम्ही काढणार आहोत. आत्तापर्यंत 6 शेड काढण्यात आले आहेत.

                                                    – ओमप्रकाश बकोरिया,
                                   अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल.

SCROLL FOR NEXT