पुणे: पोलिसांकडून शहरात गेल्या काही दिवसांपासून रात्री दहानंतर खाऊ गल्ली, टपऱ्या, हातगाड्या, पानटपऱ्या आणि लहान खाद्य व्यवसायांवर कारवाई केली जात आहे. मात्र, दुसरीकडे हडपसर परिसरात गेली दोन दशके सुरू असलेला कथित हातभट्टी दारूचा अवैध व्यवसाय पोलिसांना दिसला नाही का? असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पदपथ, रस्त्यावरील हातगाड्या, स्टॉल, ठेले तसेच लहान खाद्यपदार्थ विक्रेत्यांना रात्री दहा वाजता व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनेक भागांत पोलिसांकडून नाकाबंदी, वाहन तपासणी आणि अचानक धाडी टाकल्या जात आहेत. काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या खाद्य व्यवसायांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
अशातच हडपसर परिसरात मिथेनॉलमिश्रित गावठी दारू प्यायल्याने पाचहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे, तर काही जणांची प्रकृती गंभीर झाल्याचेही समोर आले आहे. या घटनेनंतर परिसरात सुरू असलेल्या हातभट्टी दारू विक्रीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिक
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पांढरेवस्ती परिसरात गेल्या वीस वर्षांपासून खुलेआम हातभट्टी दारू विक्री सुरू आहे. दिवसरात्र सुरू असलेल्या या व्यवसायाबाबत अनेकदा तक्रारी करूनही प्रभावी कारवाई झाली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
मिथेनॉलयुक्त दारूमुळे झालेल्या मृत्यूनंतर आता पोलिस प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे. एका बाजूला रात्री उशिरा अंडाभुर्जी, चहा किंवा खाद्यपदार्थ विकणाऱ्या लहान व्यावसायिकांवर धडक कारवाई केली जाते. मात्र, दुसऱ्या बाजूला नागरिकांच्या जिवाशी खेळणारा अवैध दारू व्यवसाय वर्षानुवर्षे सुरू राहतो, यावरून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.