पुणे : किरकोळ कारणातून झालेल्या वादात कालव्यात ढकलून एका तरुणाचा खून करून फरार झालेल्या आरोपीला हडपसर पोलिसांनी उत्तराखंडमधील हरिद्वार येथून अटक केली. वैभव मनोज जाधव (वय २४, रा. छत्रपती संभाजीनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तो २० महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.
हडपसरमधील उन्नतीनगर भागातील कालव्यात ५ मे २०२४ रोजी विनोद मधुकर शार्दुल (वय ४५, रा. दिवा, जि. ठाणे) बेशुद्वावस्थेत पडल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली होती. जाधवला कालव्यातील पाण्यातून बाहेर काढून पोलिसांनी तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच तो मरण पावल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. तपासात आरोपी जाधवने किरकोळ वादातून शार्दुलला कालव्यात ढकलून दिल्याचे समोर आले. पोलिस आपल्या मागावर असल्याची चाहूल लागताच जाधव पुण्यातून पसार झाला होता.
दरम्यान, पोलिस कर्मचारी संदीप राठोड यांना आरोपी जाधव हा उत्तराखंडमध्ये पसार झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर हडपसर पोलिसांचे पथक हरिद्वारला गेले. आरोपी एका लाॅजमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावून गुरुवारी (२५ डिसेंबर) त्याला ताब्यात घेतले. जाधव खून प्रकरणात २० महिन्यांपासून पसार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. परिमंडळ सहाचे पोलिस उपायुक्त सागर कवडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोगले, निरीक्षक नीलेश जगदाळे, उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलिस कर्मचारी दीपक कांबळे, भाऊसाहेब खटके, नीलेश किरवे, बापू लोणकर, विजय कानेकर, अजित मदने, भगवान हंबर्डे यांनी ही कामगिरी केली.
फोटोः आजच्या तारखेला हडपसर पोलिस नावाने सेव्ह आहे.
ओळीः अटक आरोपी, हडपसर पोलिसांचे पथक, वरिष्ठ पोलिस अधिकारी.