खेड : तब्बल १३ चोरीच्या गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्या अट्टल चोरट्याचा जामीन अर्ज खेड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. यु. उतकर यांनी फेटाळला आहे. सुरेश सिताराम बंडगर (वय ५२, रा. कासारशिर्षी, ता. निलंगा, जि. लातूर) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
सुरेश बंडगर याच्याविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण, कराड, उस्मानाबाद शहर, निगडी (पुणे), लातूर ग्रामीण, श्रीगोंदा, लातूर एमआयडीसी, पाटण, निगवन, शिवाजीनगर (लातूर), सातारा आणि कासारशिर्षी (लातूर) या पोलीस ठाण्यांत चोरीसह तब्बल १३ गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यातील दोन्ही आरोपी सध्या अटकेत आहेत. त्यांना जामीन मिळावा म्हणून खेड न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता.
या सुनावणीत सहाय्यक सरकारी अभियोक्ता ए. एस. चव्हाण यांनी सरकारची बाजू मांडताना, आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र तयार करण्याचे काम सुरू असून, साक्षीदारांची चौकशी करणे बाकी असल्याने जामीन मंजूर करू नये, अशी भूमिका मांडली. तपास व पुरावे यांना बाधा येऊ नये म्हणून न्यायालयाने सराईत चोर सुरेश बंडगर याचा जामीन अर्ज नामंजूर केला. या खटल्यात पोलिस हवालदार ज्ञानेश्वर कावळे यांनी न्यायालयीन पैरवी केली.