आळेफाटा : प्रतिबंधित गुटखा भरलेले वाहन आळेफाटा परिसरात येत असताना आळेफाटा पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान 28 लाख 36 हजारांचा गुटखा तसेच वाहन असा 43 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल शुक्रवार (दि. 11) रात्री साडेआठ वाजेच्या वेळेस पकडला. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून एक जण फरार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांनी दिली. सादिक अब्दुलवहाब शेख (वय 43, रा. चुनारगल्ली चोपडा, जि जळगाव) असे अटक केलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.
याबाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आयशर ट्रक (एमएच 04 एचडी 7350) यामधून बेकायदा गुटख्याची वाहतूक होणार असून हा ट्रक नाशिक बाजुकडून आळेफाटाकडे येणार आहे. त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांनी पोलिस पथकास सतर्क केले. शुक्रवारी रात्री पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील, पोलिस हवालदार पोपट कोकाटे हे नाकाबंदी करत असताना त्यांना हा ट्रक संशयितरित्या मिळून आला त्यांनी ट्रक चालकास त्याचे नाव व पत्ता विचारून त्याच्याकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊन लागला. यानंतर या ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये विनापरवाना बेकायदेशीर रित्या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित असलेला विमल कंपनीचा सुगंधित मसाला व सुगंधित तंबाखू असा पोत्यांमध्ये भरलेला एकूण 28 लाख 36 हजार रुपयांचा गुटखा मिळून आला. यानंतर ट्रक चालकास ताब्यात घेऊन त्यास अटक केली तसेच गुटखा व ट्रक असा एकूण 43 लाख 36 हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल्ल अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विश्वास जाधव पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील पोलीस हवालदार पोपट कोकाटे, विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित माळुंजे, पंडित थोरात, नवीन आरगडे शैलेश वाघमारे, विष्णू दहिफळे, गणेश जगताप, ओंकार खुणे, संतोष साळुंखे, भुजंगराव सुकाळे यांनी केली.