दिलासादायक! जीबीएसच्या 38 रुग्णांना डिस्चार्ज file photo
पुणे

दिलासादायक! जीबीएसची साथ येतेय आटोक्यात

रविवारी जीबीएसचा एकही रुग्ण आढळला नाही; तर सोमवारी केवळ दोन रुग्णांची नोंद

पुढारी वृत्तसेवा

पुणे: गुलेन बॅरी सिंड्रोम या मेंदूविषयक आजाराने जानेवारीच्या दुस-या आठवड्यापासून थैमान घातले. दूषित अन्न आणि पाण्यातून आजाराचा प्रसार होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जीबीएसची रुग्णसंख्या कमी होत असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. रविवारी जीबीएसचा एकही रुग्ण आढळून आला नाही; तर सोमवारी केवळ दोन रुग्णांची नोंद झाली.

राज्यात 14 जानेवारीपासून रुग्णसंख्या अचानकपणे वाढायला सुरुवात झाली. 20 जानेवारी रोजी जीबीएसचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. सिंहगड रस्त्यावरील नांदेड, किरकटवाडी, नांदोशी, धायरी या परिसरामध्ये सर्वाधिक बाधित रुग्ण आढळून आले.

जीबीएसच्या उद्रेकामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. आरोग्य पथके तैनात करून सर्वेक्षणास सुरुवात करण्यात आली. सर्वेक्षणात अनेक नागरिकांना जानेवारी महिन्याच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या आठवड्यात जुलाब, उलट्या, थकवा, स्नायूंमधील वेदना असा त्रास झाल्याचे आढळून आले.

जीबीएसच्या प्रसाराचे मूळ शोधण्यासाठी केंद्रीय पथक पुण्यात दाखल झाले. केंद्रीय पथकाचा अहवाल अद्याप आलेला नसला तरी एनआयव्हीमध्ये तपासणी करण्यात आलेल्या नमुन्यांमधून कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी हा जीवाणू आणि नोरोव्हायरस हा विषाणू जीबीएसच्या प्रादुर्भावास कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून प्यावे आणि अर्धवट शिजवलेले मांस खाऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले आहे.

प्रतिबंधात्मक उपायांचा भाग म्हणून शहराच्या विविध भागातील पाण्याचे 6977 नमुने रासायनिक व जैविक विश्लेषणासाठी सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, 85 जलस्रोतांचे नमुने दूषित आढळले आहेत. तसेच, पुणे शहरामधील 46,534 घरे, पिंपरी चिंचवडमधील 26,460 घरे आणि पुणे ग्रामीण भागातील 13,956 घरे अशा एकूण 86,950 घरांचे सर्वेक्षण केले आहे. तसेच, 82 नमुने बंगळुरूतील निम्हान्स संस्थेकडे चाचणीसाठी पाठवले आहेत.

135 रुग्णांना डिस्चार्ज

राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचे आतापर्यंत 210 रुग्ण आढळून आले आहेत. एकूण 210 रुग्णांपैकी 182 रुग्णांमध्ये जीबीएसचे निदान झाले आहे तर 28 रुग्ण संशयित म्हणून नोंद केले आहेत. आतापर्यंत 135 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. सध्या 41 रुग्ण आयसीयूमध्ये तर 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. एकूण रुग्णसंख्येपैकी शहरातील 42 रुग्ण, पुणे महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील 94, पिंपरी चिंचवडमधील 32, पुणे ग्रामीणमधील 32 आणि इतर जिल्ह्यातील 10 रुग्ण आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT