पुणे: दारी आनंदाची गुढी...कुटुंबांसोबत देवदर्शनाचे निमित्त...पंचपक्वानांचा आस्वाद अन् नवीन वर्षाचे आनंदात स्वागत...असे उत्साही वातावरण रविवारी (दि.30) पाहायला मिळणार असून, रविवारी गुढीपाडव्याचा सण जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे.
मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घरोघरी विशेष तयारी करण्यात आली असून, सकाळी पारंपरिक वेशभूषेत कुटुंबीयांसोबत गुढी उभारण्यात येणार आहे. याच आनंदी सणाच्या निमित्ताने शहर आणि उपनगरात मिरवणुका काढण्यात येणार असून, धार्मिकसह सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडव्याला नवीन कार्याची तसेच नवीन दागिने, वाहन आणि घर खरेदीचा मुहूर्तही साधण्यात येणार असून, अनेकांनी त्यासाठी बुकिंगही केले आहे.
गुढीपाडव्याला नवचैतन्याची गुढी सगळीकडे उभारली जाणार असून, साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला नवीन संकल्पनांची आणि कार्याची सुरुवात करण्यात येणार आहे. पारंपरिक वेशभूषेत कुटुंबीयांसमवेत घरोघरी गुढी उभारली जाणार आहे. घरोघरी पंचपक्वान्नांचाही बेत आखला जाणार आहे.
सणाच्या पूर्वसंध्येला शनिवारी (दि.29) सगळीकडे तयारीचे वातावरण पाहायला मिळाले. ठिकठिकाणी उत्सव मंडपासह मिरवणुकांची तयारी करणारे कार्यकर्ते, पदाधिकारी पाहायला मिळाले. तर मंदिरांमध्येही विद्युत रोषणाई, रंगबिरंगी पताक्यांची आणि फुलांची सजावट करण्यात आली.
तर बाजारपेठांमध्येही खरेदीचा उत्साह पाहायला मिळाला. साहित्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये लगबग पाहायला मिळाली. रविवार पेठ, लक्ष्मी रस्ता, मंडई, तुळशीबाग यासह विविध ठिकाणी साखरेच्या गाठी आणि लहान गुढींच्या खरेदीसाठी गर्दी झाली होती. खासकरून गुढी उभारणीसाठी लागणार्या पूजेच्या साहित्यांच्या खरेदीवरही अनेकांनी भर दिला, याशिवाय मिठाईचीही खरेदी केली.
आज मध्य पुण्यात निघणार मिरवणुका
गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे शहराच्या मध्यभागात रविवारी (दि.30) मिरवणुकीचे आयोजन केले आहे. महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सकाळी साडेआठ वाजता मिरवणुकीला सुरुवात हेईल. यामध्ये पारंपरिक वेशभूषेत पुणेकर सहभागी होणार आहेत. तांबडी जोगेश्वरी मंदिर येथे समारोप होणार आहे. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील पदाधिकारी आणि विविध क्षेत्रात काम करणार्या महिलांच्या हस्ते गुढी उभारण्यात येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यावर आधारित रथासह अनेक विशेष रथांचा देखील सहभाग असणार आहे.
कलाकार उभारणार सांस्कृतिक कलावंत गुढी
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे रविवारी (दि.30) सांस्कृतिक कलावंत गुढी उभारली जाणार आहे. मराठी नववर्ष आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रम सकाळी 10 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे होणार आहे. गुढीपूजन अभिनेत्री वंदना गुप्ते आणि अभिनेते संकर्षण कर्हाडे यांच्या हस्ते होणार आहे.
टिळक पुतळ्यापासून निघणार मिरवणूक
मानाचा चौथा महागणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टतर्फे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त (125 वर्ष) मिरवणुकीचे आयोजन केले आहे. सकाळी आठ वाजता महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून मिरवणुकीला सुरुवात होईल.