पुणे: पेरूवर तिखट-मीठ लावून तो खाण्याची मजा काही औरच. चिमुकल्यांपासून ज्येष्ठांपर्यंत आवडीने खाल्ल्या जाणार्या पेरूचा हंगाम सध्या बहरला आहे. त्यामुळे गुलटेकडी मार्केट यार्डात पेरूची मोठी आवक होत आहे. पांढर्या आणि गुलाबी रंगाचा गाभा असलेले पेरू बाजारात उपलब्ध आहेत. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात किलोला दर्जानुसार 20 ते 40 रुपये भाव मिळत आहे.
पुणे जिल्ह्यासह सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातून आवक होत आहे. पेरूचा हंगाम सुरू होऊन 15 ते 20 दिवसांचा कालावधी उलटला आहे. यंदा पोषक वातावरणामुळे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत दररोज दीडपट म्हणजेच 25 ते 30 टन आवक होत आहे. (Latest Pune News)
आवक जास्त होत असल्याने मागील वर्षीच्या तुलनेत 10 ते 15 टक्के कमी भाव मिळत आहे. नोव्हेंबरपर्यंत हा हंगाम सुरू राहणार आहे. शहर, उपनगरातील फळविक्रेते, ज्यूूस विक्रेते, पर्यटनस्थळ येथून पेरूला मागणी आहे. याबरोबरच आईस्क्रीम आणि प्रक्रिया उद्योगाकडूनही खरेदी करण्यात येत असल्याचे व्यापार्यांनी नमूद केले.
पांढर्या आणि गुलाबी रंगाचा गाभा असलेल्या पेरूची आवक होत आहे. पांढरा गाभा असलेल्या पेरूला ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. त्याअनुसार खरेदीदार पेरूची खरेदी करीत आहे.- अरविंद मोरे, पेरूचे व्यापारी, मार्केट यार्ड