पुणे

…म्हणून मी प्रभावित झालो! पालकमंत्र्यांकडून पिंपरी-चिंचवड पोलिसांचे कौतुक

अमृता चौगुले

पिंपरी : पिंपरी- चिंचवडचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहरातील बालगुन्हेगारी संपवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना व्हिडीओद्वारे प्रेझेंटेशन दाखवण्यात आले. यावर बोलताना पाटील म्हणाले की, बालगुन्हेगारी रोखण्यासाठीचे पिंपरी- चिंचवड पोलिसांचे प्रयत्न पाहून मी प्रभावित झालो आहे. त्यांच्या या उपक्रमासाठी कंपन्यांच्या 'सीएसआर' फंडातून मदत केली जाऊ शकते. सुदैवाने माझे नेटवर्क मोठे आहे. त्यामुळे आपण मोठ्या प्रमाणात 'सीएसआर' फंड उभा करू शकतो.

यावेळी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, अपर आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, मंचक इप्पर, आनंद भोईटे, आमदार महेश लांडगे, माजी महापौर उषा ढोरे, महापालिकेचे माजी सभागृह नेते नामदेव ढाके, एकनाथ पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा पिंपरी-चिंचवड शहरातील नियोजित दौरा शुक्रवारी (दि. 21) संपन्न झाला. त्यांनी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाला भेट दिली. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या दालनात बैठक घेऊन त्यांनी शहर पोलिस दलाच्या अडचणी समजून घेतल्या. दरम्यान, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलिसांसाठी आणखी वाहने पाहिजे आहेत. त्यासाठी चार कोटींच्या निधी उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यावर पालकमंत्री पाटील यांनी वाहनांसाठी दोन कोटी रुपये मंजूर केले. त्यानंतर शहरातील गुन्ह्यांचा देखील आढावा घेण्यात आला.

यामध्ये गुन्हेगारीचे स्वरुप, सायबर क्राईम, गंभीर गुन्ह्यांतील तपास, पोलिसांची विशेष कामगिरी याबाबत सादरीकरण करण्यात आले. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. आयुक्तालय व मुख्यालयासाठीच्या जागांचे प्रस्ताव देखील मार्गी लावण्यात येतील. तसेच, सायबर पोलिस ठाणे मंजुरीसाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. मनुष्यबळाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पहिल्या टप्प्यात आपण 200 जागांसाठी पोलिस भरती करणार आहे. तसेच, पोलिसांना नवीन वाहने घेण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT