पुणे ः वस्तू आणि सेवा करातील (जीएसटी) सवलतींमुळे ग्राहकांना 350 सीसी क्षमतेपर्यंतच्या दुचाकींचे दर 5 हजार 800 ते 15 हजार रुपयांपर्यंत कमी होतील. तर, 1,500 सीसी क्षमतेच्या आतील कारच्या किमती 25 ते 40 हजार रुपयांपर्यंत कमी होतील.
जीएसटी कौन्सिलच्या बुधवारच्या बैठकीत वाहनांवरील कर कपात करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार 350 सीसी आणि त्याखालील क्षमतेच्या दुचाकींवरील कर 28 वरून 18 टक्के करण्यात आला आहे. तर, 1,200 सीसीपर्यंतच्या आणि चार मीटर (4 हजार एम.एम.) लांबीच्या पेट्रोल आणि सीएनजीवरील वाहनांचा करही 28 वरून 18 टक्के झाला आहे. याशिवाय 1,500 सीसीपर्यंतच्या डिझेलवरील वाहनांचा करही 28 वरून 18 टक्के झाला आहे. इलेक्ट्रिक वाहनांची 5 टक्क्यांची कर श्रेणी कायम ठेवण्यात आली आहे.
देशात विकल्या जाणार्या 80 टक्के दुचाकी या 350 सीसी क्षमतेपर्यंतच्या आहेत. या दुचाकींच्या किमती सीसीनुसार 5,800 ते 15 हजार रुपयांपर्यंत कमी होतील. 350 सीसीवरील वाहनांच्या किमतीत 22 ते 35 हजारांची वाढ होईल.
1,200 सीसीपर्यंतच्या कारवर साधारणत: 15 ते 20 हजार रुपयांची सवलत मिळेल. तर, 1,500 सीसीपर्यंतच्या कारवर 35 ते 40 हजार रुपयांची सवलत मिळेल.
केवळ लहान कारच्याच नव्हे, तर आलिशान कारच्या किमतीत तब्बल 30 लाखांपर्यंत घट होणार आहे. लक्झरी कारवर 40 टक्के कर आकारताना त्यावरील नुकसानभरपाई उपकर पूर्णतः रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे कारच्या किमती घटणार आहेत.