पुणे : केंद्र सरकारने 22 सप्टेंबरपासून दुग्धजन्य पदार्थांवरील जीएसटी करात कपात केली आहे. त्यामुळे दुग्धजन्य पदार्थांमध्ये प्रामुख्याने पनीर, आईस्क्रीम, बटर व तुपाचे दर कमी झाल्याची माहिती पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ तथा कात्रज दूध संघाचे अध्यक्ष ॲड. स्वप्निल ढमढेरे यांनी दिली. त्यामुळे प्रत्येक उपपदार्थ सरासरी 20 ते 30 रुपयांनी कमी झाले आहेत. ऐन सणासुदीच्या दिवसांत दर कमी झाल्याने दुग्धजन्य पदार्थांना मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. (Latest Pune News)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटीमधील नवीन सुधारणांची घोषणा नुकतीच केली असून, त्यानुसार अंमलबजावणी सुरू झाली आहे. लोकांच्या जीवनमानाचा खर्च कमी करणे आणि आर्थिक उलाढालींना चालना देण्याच्या उद्देशाने ही एक ऐतिहासिक सुधारणा असल्याचे म्हटले आहे. जीएसटी दरातील सुधारणांमुळे ग्राहकांसह दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठा आधार मिळाला आहे. जास्तीत जास्त दूध व दुग्धजन्य पदार्थांचा आस्वाद घेण्याचे आवाहनही ॲड. ढमढेरे यांनी केले.