नारायणगाव: जुन्नर तालुक्यामध्ये उन्हाळी हंगामातील टोमॅटोची लागवड मोठ्या प्रमाणात झाली असून, विविध रोगांचा प्रादुर्भाव व प्रचंड तापमान वाढल्याने टोमॅटोचे पीक जगविण्यासाठी बळीराजाला मोठी कसरत करावी लागत आहे. विविध प्रकारचे रोग, व्हायरसमुळे महागडी औषधे फवारण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे.
जुन्नर तालुक्यामध्ये एप्रिल महिन्यात टोमॅटोची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. लागवड झालेल्या टोमॅटोची तोडणी 15 जूनपासून सुरू होणार आहे. लागवड झाल्यावर साधारण टोमॅटो सुरू व्हायला अडीच महिने लागतात. यंदाच्या हंगामात लागवड केलेली टोमॅटोच्या बागेची बांधणी सध्या सुरू आहे, तर काही ठिकाणी टोमॅटोचे मांडव करण्याचे काम सुरू आहे.
दरवर्षी या भागामध्ये शेकडो एकरची लागवड होते. त्याचबरोबर उंब्रज, काळवाडी 14 नंबर, भोरवाडी नारायणगाव, वारूळवाडी, हिवरे, खोडद या भागातसुद्धा उन्हाळी हंगामात टोमॅटोचे पीक घेतले जाते. टोमॅटो पिकाला सध्या तिरंगा व प्लास्टिक या व्हायरसचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो आहे. तसेच करपा, पांढरी माशी व पाने वाकडी होणे हा प्रादुर्भावदेखील सध्या टोमॅटो पिकाला वाढला आहे.
सध्या उष्णता तीव्र असल्याने टोमॅटो पीक जगवणे शेतकर्यांसाठी मोठे जिकरीचे ठरत आहे. शेतकरी तळहाताच्या फोडाप्रमाणे या टोमॅटो बागेची काळजी घेत आहेत. व्हायरसचा प्रादुर्भाव अधिक होऊ नये म्हणून ड्रिंचिंग पद्धतीने झाडाच्या खोडाला औषध सोडले जात आहे. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने टोमॅटोची फुलगळसुद्धा वाढण्याची भीती असते. त्यामुळे शेतकर्यांना खूप काळजी घ्यावी लागत आहे. वारंवार औषधांची फवारणी करावी लागत आहे, तर काही शेतकरी टोमॅटोच्या बागेला संरक्षण म्हणून साड्यांचा आडोसा करीत आहेत.
आमच्या कैलासनगर परिसरामध्ये 50 हेक्टरच्या आसपास दरवर्षी टोमॅटोची लागवड होत असते. परंतु, यंदा अत्यल्प लागवड झाली आहे. भांडवली खर्च, निसर्गाचा लहरीपणा व बदलते हवामान, यामुळे टोमॅटोचे पीक घेणे आता जिकिरीचे होऊन बसले आहे. त्यातच योग्य बाजारभाव मिळाला नाही आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढला तर शेतकर्यांना तोटा सहन करावा लागतो. यंदाच्या वर्षी येडगाव धरणामध्ये पाणी कमी असल्यामुळे उन्हाळ्यात पिकाला पाणी मिळेल की नाही, ही शंका असल्यामुळे देखील टोमॅटो लागवड कमी झाली.- चंद्रकांत हांडे, टोमॅटो उत्पादक शेतकरी