पुणे

कोरेगाव भीमा : वढू बुद्रुक येथे शंभूराजेंना अभिवादन ; समाधीवर महाभिषेक

अमृता चौगुले

कोरेगाव भीमा : पुढारी वृत्तसेवा :  श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या 334 व्या बलिदान स्मरणदिनी हजारो शंभूभक्तांनी छत्रपती श्री संभाजी महाराज यांना आदरांजली वाहिली. पहाटेच शंभूभक्तांनी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या 334 व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राजांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. 'धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय' या घोषणांनी कार्यक्रमास सुरुवात झाली. सकाळी सहा वाजता शंभू महाराज, कवी कलश व वीर शिवले यांच्या समाधीवर महाभिषेक करण्यात आला.

हजारो भाविकांच्या सानिध्यात मूक पदयात्रा काढण्यात आली. जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पोलिस अधीक्षक अंकित गोयल व प्रांताधिकारी स्नेहल देवकाते, घोडगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष ऋषीराज पवार यांच्या हस्ते शासकीय पूजा झाली. शिरीष महाराज मोरे यांनी आपल्या कीर्तनामध्ये संभाजी महाराजांचा इतिहास शंभू भक्तांसमोर मांडत त्यांनी धर्मासाठी केलेले बलिदान व स्वराज्यासाठी केलेले कार्य यावर प्रकाश टाकत शंभू महाराजांना अभिवादन केले.

आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी 5 पर्यंत 200 पेक्षा अधिक शंभू भक्तांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदविला. शंभू भक्तांसाठी श्री धर्मवीर छत्रपती संभाजी राजे युवा मंच, कृती समिती वढू बुद्रुक व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी गृहविभागातर्फे रायफलच्या फायरिंगद्वारे महाराजांना शासकीय सलामी देण्यात आली.

पुरंदरवरून आलेल्या पालखीचे स्वागत ग्रामस्थांनी केले. या वेळी वारकरी पंथाचे नृत्य पाहून ग्रामस्थ व शंभूभक्त भारावून गेले. अखिल भारतीय दहशतवादविरोधी संघटनेचे अध्यक्ष मनिंदरसिंह बिट्टा यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी शंभूभक्त व ग्रामस्थांनी सभेमध्ये मोठी गर्दी केली होती. व्याख्यानानंतर पुरस्कारांचे वाटप करण्यात आले. यामध्ये रवी पडवळ व संजय साळुंखे यांना मशंभू सेवाफ पुरस्कार देण्यात आला. मनिंदरसिंह बिट्टा यांना मस्वराज्यरक्षक धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजफ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमास आमदार महेश लांडगे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदीप कंद, बापूसाहेब पठारे आदी नेते उपस्थित राहिले; मात्र बडे नेते गैरहजर असल्याने शंभूभक्त व ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. वढू बुद्रुक ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, संचालक, श्री धर्मवीर छत्रपती संभाजी राजे युवा मंच तसेच कृती समिती वढू बुद्रुकचे सर्व सदस्य, ग्रामस्थ व मोठ्या संख्येने शंभूभक्त याप्रसंगी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT