पुणे

यशवंत साखर कारखान्याबाबत ‘ग्रीन सिग्नल’; देवेंद्र फडणवीस यांचे भाजप शिष्टमंडळास आश्वासन

अमृता चौगुले

उरुळी कांचन(पुणे); पुढारी वृत्तसेवा : हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या बंडखोरांसह भाजपने बाजी मारल्याने बाजार समितीच्या सत्ताधारी पदाधिकार्‍यांना यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या प्रश्नात पूर्ण मदत करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटीत दिल्याने बाजार समितीच्या माध्यमातून कारखाना सुरू होण्याच्या प्रयत्नांचा विषय बाजार समितीच्या अजेंड्यावर येणार आहे.

हवेली (पुणे) बाजार समितीची तब्बल 19 वर्षांनंतर निवडणूक होऊन बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर व भाजपसहित सर्वपक्षीय पॅनेलला 15 पैकी 13 जागांवर यश मिळाले आहे. या निवडणुकीनंतर भाजपला बाजार समितीत उपसभापतिपद मिळाले आहे. प्रथमच या बाजार समितीत भाजप सत्ताकेंद्रात पोहचल्याने साहजिकच बाजार समितीच्या सत्ताकेंद्राने भाजपचा जनाधार वाढणार आहे.
आता या बाजार समितीच्या सत्ताधारी संचालक मंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुणे दौर्‍यात भेट घेतली आहे.

या भेटीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या यशाचे कौतुक करून बाजार समितीसह थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी कारखाना सुरू करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन पदाधिकार्‍यांनी दिले. दरम्यान, तब्बल 23 वर्षांनंतर बाजार समितीवर लोकनियुक्त संचालक मंडळ विराजमान झाल्याने बाजार समितीच्या माध्यमातून कारखान्याला मदत करण्याचे धोरण संचालक मंडळाकडून करण्यात येणार आहे.

बाजार समितीच्या सव्वाशे कोटींच्या ठेवीतून कारखान्याला मदत होते काय? याबाबत चर्चा सुरू आहे. कारखान्याची जमीन खरेदी करण्याचा मुद्दा समितीच्या अजेंड्यावर येईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. यासाठी राज्य सरकार आवश्यक त्या परवानगी देऊ शकते, याबाबतची चर्चा आहे. त्यामुळे कारखाना निवडणुकीच्या तोंडावर आघाडी पॅटर्न सभासदांपुढे हा मुद्दा घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी सुरू झाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT