पुणे

लोणावळा : उड्डाणपूल बांधून देण्याच्या मागणीला हिरवा कंदील

अमृता चौगुले

लोणावळा : पुढारी वृत्तसेवा :  मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेच्या मिसिंग लिंकमुळे बाधित होणार्‍या लोणावळा ते पवनानगर या रोडवर उड्डाणपूल बांधून देण्याच्या ग्रामस्थांच्या मागणीला रस्ते विकास महामंडळाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. या नियोजित पुलाचे नकाशे तयार करण्यात आले असून, लवकरच या पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन महामंडळ अधिकार्‍यांकडून ग्रामस्थांना देण्यात आले आले. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेच्या मिसिंग लिंकचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सिंहगड कॉलेजच्या पुढं डोंगरगाव हद्दीत ही मिसिंग लिंक बोगद्यातून बाहेर पडून मुख्य एक्स्प्रेस हायवेला मिळत आहे.

ज्याठिकाणी मिसिंग लिंक एक्स्प्रेस हायवेला जोडली जात आहे. त्याठिकाणी एक्स्प्रेस हायवेच्या दोन्ही बाजूला अजून दोन दोन लेन वाढवण्यात येत आहे. मात्र, ही डेव्हलपमेंट सुरू असताना त्याचा फटका या भागातून जाणार्‍या लोणावळा ते पवनानगर, पौड रोड या रस्त्याला बसला आहे. डोंगरगाव वाडी याठिकाणी या रस्त्याला मिसिंग लिंक आडवी जात असल्याने मिसिंग लिंकच्या कामासाठी या रस्त्याने होणारी सरळ वाहतूक रस्ते विकास महामंडळाकडून बंद करण्यात आली होती. तसेच या मार्गाला कायमस्वरूपी पर्याय म्हणून सदर मिसिंग लिंकच्या बाजूने सर्व्हिस रोड तयार करून देवले गावाच्या हद्दीतील एक्स्प्रेस हायवेवर असलेला पूल वापरून तेथून पलीकडे जाता येत आहे. त्याठिकाणी रस्त्याच्या पलीकडे उतरणारा असा सुमारे दोन ते अडीच किलोमीटर लांब वळसा घालणारा मार्ग तयार करण्याची योजना आखण्यात आली होती.

लोणावळ्यापासून डोंगरगावच्या पुढं औंढे, औंढोली, लोहगड ग्रामपंचायतसह दुधीवरे खिंडीतून पवना धरण आणि त्या भागातील अनेक गावांना लोणावळ्यासोबत जोडणार्‍या या रस्त्याने दररोज कामकाज, शिक्षण, वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यासाठी हजारो स्थानिक ग्रामस्थ आणि पवना धरण, लोहगड विसापूर, तिकोणा किल्ला, दुधीवरे येथील प्रति पंढरपूर यांना भेट देण्यासाठी येणारे लाखो पर्यटक ये जा करीत असतात. असे असताना कोणतीही पूर्व कल्पना न देता मिसिंग लिंक च्या कामासाठी हा रस्ता रहदारी साठी बंद करण्यात आला होता. यावर स्थानिक ग्रामस्थांनी तसेच आजूबाजूच्या ग्रामपंचायतीने आक्रमक होत मिसिंग लिंकचे काम थांबून रस्ता पुन्हा रहदारीसाठी मोकळा करून घेतला.

तसेच पर्याय म्हणून नियोजित असलेल्या मार्गाला विरोध करून आहे त्याच ठिकाणी लोणावळा पवनानगर रोडवर मिसिंग लिंक तसेच एक्सप्रेस हायवे लांदणारा उड्डाणपूल तयार करण्याची मागणी लावून धरली. तसेच यासाठी ग्रामसभेचे ठराव करून रस्ते विकास महामंडळाला सादर केले. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि आमदार सुनील शेळके यांनी देखील ग्रामस्थांच्या मागणीचा पाठपुरावा शासनदरबारी केला. माजी राज्यमंत्री भेगडे यांनी या कामासाठी आवश्यक असणारा निधी राज्यसरकारकडून तत्काळ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत यासंदर्भात रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांसोबत बैठक देखील घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT