पुणे: ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांना पर्यावरणपूरक बनविण्याच्या उद्देशाने ‘ग्रीन स्कूल’ प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, ऊर्जा बचत आणि शाश्वत जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करण्यावर विशेष भर दिला जात आहे.
‘सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्ह’ अंतर्गत आणि टाटा ऑटो कंप सिस्टिम्स प्रा. लि. यांच्या CSR निधीतून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. खेड तालुक्यातील बिरदवाडी, देहूगाव, तोरणे आणि राममळा (कडूस) येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे.
या प्रकल्पाअंतर्गत शाळांमध्ये सौर ऊर्जा प्रणाली बसविणे, पावसाच्या पाण्याचे संकलन (रेन वॉटर हार्वेस्टिंग), तसेच सेंद्रिय खत निर्मिती यांसारख्या उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरणपूरक तत्त्वांची ओळख होत असून, शालेय स्तरावरच शाश्वततेचे धडे दिले जात आहेत.
विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी ‘ग्रीन आर्मी’ची स्थापना करण्यात आली असून, या माध्यमातून शाळांमधील हरित उपक्रमांची अंमलबजावणी आणि देखरेख विद्यार्थी स्वतः करत आहेत. तसेच विविध कार्यशाळा, मार्गदर्शन सत्रे आणि अभ्यासपूर्ण उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना पर्यावरणाच्या जाणीवा अधिक दृढ करण्यात येत आहेत.
या उपक्रमामुळे नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर, पाणी संवर्धन आणि ऊर्जा बचतीस चालना मिळणार असून, शाळांचा परिसर अधिक हिरवागार आणि स्वच्छ होण्यास मदत होणार आहे. स्थानिक पातळीवरही या प्रकल्पाचे सकारात्मक परिणाम दिसून येत असून, भविष्यात अधिक शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.