pune news
Green chillies, beans, kidney beans pudhari photo
पुणे

हिरवी मिरची, बीन्स, राजमा तेजीत

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : गेल्या महिन्यात काहीसे कमी झालेले भाज्यांचे भाव या महिन्यात पुन्हा वाढले आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच हिरवी मिरची, गवार यांसह शेवगा, बीन्स, राजमा, भेंडी या फळभाज्याचे भाव वधारले दिसून आले. यातील बहुतांश भाज्यांनी शंभरी पार केली आहे.

मोशी येथील नागेश्वर महाराज उपबाजार समितीमध्ये या आठवड्यात 2 हजार 258 क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. तर, 50 हजार 800 पालेभाज्या गड्डीची आवक झाली आहे.

ही आवक गेल्या आठवड्यातील आवकपेक्षा कमी होती. परिणामी, भाज्यांच्या दरांमध्ये पाच ते दहा टक्के वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. पिंपरी बाजारातील आवक स्थिर होती.

दुसरीकडे, राज्य शासनाने कोरोनाचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले असले तरी, अद्याप ग्राहकांची संख्या जेमतेम आहे. त्यामुळे ग्राहक येतील या आशेने विक्रेत्यांनी जादा माल खरेदी केला होता.

उन्हाळ्यात भाजीपाल्याचे दर वाढलेले असतात. सध्या उन्हाळा सुरू झाला नसला तरी फळभाज्यांच्या दरात वाढ झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.

सध्या फळभाज्यांचे भाव वाढले असले तरी पालेभाज्यांचे भाव कमी झाल्याचे दिसून आले. मोशी उप बाजार समितीमध्ये 16 हजार 900 कोथिंबीर तर, 14 हजार 800 मेथीच्या गड्डीची आवक झाली आहे.

बाजारात मेथीची गड्डी 10 रुपये तर पालकाची गड्डी 10-12 रुपये तर कांदापातची गड्डी 15 रुपयांना मिळत होती. कोथिंबिरीच्या भावामध्ये पुन्हा वाढ झाली असून ती 15-20 रुपये प्रति गड्डी पोहोचली आहे.

SCROLL FOR NEXT