पुणे

बाष्पयुक्त वार्‍यांनी प्रदूषणात मोठी घट; यंदा एकच दिवस काही तास पुण्याची हवा प्रदूषित

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: दिवाळीपर्यंत धो-धो बरसलेल्या मान्सूनमुळे शहरात बाष्पयुक्त वार्‍यांचा मुक्काम होता. त्यामुळे गत तीन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत सर्वांत कमी प्रदूषण मोजले गेले. त्यामुळे शहरातील हवा दिवाळीत फक्त एकच दिवस मध्यम गटात गणली गेली. 25 ऑक्टोबर रोजी शहरातील काही भागांत किंचित प्रदूषण नोंदवले गेले.

यंदाची दिवाळी पुणेकरांसाठी प्रदूषणाच्या दृष्टीनेही चांगली ठरली आहे. कारण यंदा शहरात फक्त एकच दिवस अन् तेही काही तास शहरात किंचित प्रदूषण वाढल्याची नोंद झाली. 24 रोजी लक्ष्मीपूजन होते. त्यामुळे रात्री 1 ते पहाटे 6 पर्यंंत आकाशात प्रदूषण झाले. त्यामुळे हे प्रदूषण 25 रोजी नोंदवले गेले. त्या दिवशी शहराची हवा सर्वसाधारण गटात गणली गेली. गेल्या तीन वर्षांतील हे नीचांकी प्रदूषण म्हणून गणले गेल्याची नोंद आयआयटीएमने नोंदवली आहे.

शिवाजीनगर, कोथरूड भागात सर्वाधिक आतषबाजीची नोंद..
आयआयटीएमने घेतलेल्या नोंदीनुसार यंदा शहरावर बाष्पयुक्त वार्‍यांचा प्रभाव होता. तरीही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 24 ऑक्टोबर रोजी शहरातील शिवाजीनगर व कोथरूड भागात फटाक्यांची मोठी आतषबाजी झाल्याने त्या भागात इतर भागांच्या तुलनेत जास्त प्रदूषण नोंदवले गेले. मात्र, एकूण शहराची हवा मध्यम प्रकारच्या प्रदूषणात गणली गेली.

एकच दिवस हवा किंचित प्रदूषित..
दिवाळी 21 रोजी सुरू झाली. पण, फटाके 22 पासून नागरिकांनी फोडण्यास प्रारंभ केला. 26 रोजी भाऊबीज व पाडवा एकत्र आला. या चार ते पाच दिवसांत सर्वही दिवस शहराच्या हवेची गुणवत्ता गूड टु सॅटिसफॅक्टरी प्रकारात गणली गेली. 24 रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झालेले प्रदूषण 25 रोजी वातावरणात पसरले. त्यामुळे 25 ऑक्टोबर रोजी शहराची हवा मध्यम प्रकारांत गणली गेली. या दिवशी शहराचे प्रदूषण किंचित वाढून काही तासांत कमी झाले होते.

25 टक्के हवा प्रदूषित झाली..
मागील दोन्ही वर्षांची दिवाळी कोरोनाच्या प्रभावाखाली गेल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये फटाके फोडण्याचा उत्साह कमीच होता. मात्र, यंदा कोरानाचे सावट पूर्ण दुर झाल्याने फटाके खूप मोठ्या प्रमाणावर फुटून प्रदूषणही वाढणार, असा अंदाज होता; मात्र मान्सूनचा मुक्काम वाढल्याने त्याचा सकारात्मक परिणाम प्रदूषित घटकांवर झाला. फटाके मोठ्या प्रमाणावर फुटूनही प्रदूषण मात्र कमी झाले.

लक्ष्मीपूजनाला सर्वाधिक आतषबाजी, तरीही कमी प्रदूषण..
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टॅ—ापिकल मेट्रोलॉजी (आयआयटीएम) ही संस्था पाषाण भागात आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अख्त्यारीत येणार्‍या या संस्थेच्या वतीने भारतातील दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आणि पुणे या महानगरातील हवा प्रदूषणाची चाचणी दिवाळीत दर वर्षी घेतली जाते. प्रामुख्याने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्वाधिक फटाके फुटत असल्याने त्या दिवशी शहराची हवा घातक प्रकारात मोडली जाते. नंतर बरेच दिवस ते दूषित घटक हवेत राहतात.

मात्र, यंदा मान्सूनचा मुक्काम दिवाळी सुरू झाली तरीही होता. 21 ऑक्टोबर रोजी दिवाळी सुरू झाली अन् मान्सून 23 रोजी परतीसाठी निघाला, मात्र तोवर शहरासह जिल्ह्यात खूप पाऊस झालेला होता. ग्रामीण भागात पिके पाण्याखाली गेली होती. हवेत प्रचंड मोठ्या प्रमाणावर बाष्प असल्याने यंदा उत्साहात दिवाळी होऊनही प्रदूषण घटले, कारण हवेतील बाष्पामुळे प्रदुूषण फैलावले नाही, ते जागीच नाहीसे झाले.

मध्यम गटात मोडली गेली हवेची गुणवत्ता (मयक्रो ग्रॅम प्रति क्युबिक मीटर)
दिनांक धूलिकण (2.5) हवेची गुणवत्ता
22 ऑक्टोबर 27 46 (उत्तम)
23 ऑक्टोबर 44 72 (मध्यम)
24 ऑक्टोबर 57 95 (मध्यम)
25 ऑक्टोबर 67 122 (किंचित वाढ)

SCROLL FOR NEXT