पुणे

वालचंदनगरची नात अमेरिकेत पंतप्रधान मोदींसमोर सादर करणार अमेरिकन राष्ट्रगीत

अमृता चौगुले

वालचंदनगर : पुढारी वृत्तसेवा :  वालचंदनगर येथील कै. विठ्ठल भोसले व मंगल भोसले यांची नात रिया पवार (मूळ रा. पुणे, वय 16) ही अमेरिकेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर अमेरिकेचे राष्ट्रगीत सादर करणार असून, पुण्याचा आवाज अमेरिकेमध्ये घुमणार आहे.
कै. विठ्ठल भोसले यांची मुलगी श्रद्धा हिचा पुण्यातील रास्ता पेठमधील राहुल सुरेश पवार यांच्याशी विवाह झाला आहे. श्रद्धा ही इंजिनिअर असून, विवाहानंतर ती आपल्या पतीसह अमेरिकेत न्यू जर्सीमध्ये स्थायिक झाली. श्रद्धा यांची मुलगी रिया व मुलगा रिशान हे अमेरिकेत शिक्षण घेत आहेत. रियाचा आवाज सुंदर असून, तिला गाण्याची आवड आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासून रिया गाणी गात आहे. मूळ भारतीय वंशाची; मात्र अमेरिकन असलेल्या रियाला भारतीय संस्कृतीची आवड असून, ती मराठी उत्तम बोलते. तसेच ती भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षणाचे धडे गिरवत असून, बॉलिवूड आणि वेस्टर्न संगीतही शिकते आहे. रियाने 2021 मध्ये मिस इंडिया टीन न्यू जर्सीचा किताब पटकाविला आहे.

दरम्यान, 23 जून 2023 रोजी वॉशिंग्टन डीसीमधील रोनाल्ड रीगन बिल्डिंगमध्ये अनिवासीय आणि भारतीय वंशज यांच्या कार्यक्रमादरम्यान रिया पवार हिला नरेंद्र मोदी यांच्यासमोर अमेरिकन राष्ट्रगीत गाण्याची संधी मिळाली आहे. मूळ भारतीय असलेल्या रियाला आपल्या देशाच्या पंतप्रधानांसमोर सादरीकरण करण्यास संधी मिळाल्याने ती आनंदी व उत्साही आहे. कै. विठ्ठल भोसले हे वालचंदनगर कंपनीमध्ये कामाला होते, तर मंगल भोसले ह्या कळंबमधील वालचंद विद्यालय व वर्धमान विद्यालयामध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. कै. विठ्ठल भोसले यांनी वालचंदनगर कंपनीतील आयएमडी कामगार समन्वय संघाच्या खजिनदारपदावर काम केले आहे. 2011 मध्ये त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांचे पुत्र संदीप भोसले हे इंजिनिअर असून, 2001 पासून तेही अमेरिकेमध्ये आहेत. रियाला तिची आई, मामा व आजीमुळे वालचंदनगरविषयी प्रेम असून, तिच्या या कामगिरीचे वालचंदनगर परिसरातून कौतुक होत आहे.

SCROLL FOR NEXT