पुणे

पुणे : एमपीएससी हाच ‘प्लॅन बी’ हवा; पदवी घेतलेल्या शिक्षणाचाच करावा करिअरसाठी विचार

अमृता चौगुले

गणेश खळदकर
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीची परीक्षा दरवर्षी लाखो विद्यार्थी देत असल्याने सनदी नोकर्‍यांसाठी जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे. केवळ कला शाखा नाही, तर अभियांत्रिकी, फार्मसी, वैद्यकीयचे उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांचा मार्ग पत्करला असून, तीव्र स्पर्धेमुळे येणार्‍या अपयशाने काही जण आत्महत्येच्या धक्कादायक मार्गाने गेले आहेत. या परिस्थितीचा 'पुढारी'ने आढावा घेतला असता, विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा जरूर द्यावी; पण एमपीएससी हा 'प्लॅन बी' ठेवण्याची आणि पदवी-पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या क्षेत्रात करिअर करण्याची गरज पुढे आली आहे.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शाश्वत नोकरीची संधी मिळत असल्यामुळे आणि तशा प्रकारची संधी खासगी क्षेत्रात उपलब्ध नसल्यामुळे उच्च शिक्षित तरुण नोकरीच्या आशेने स्पर्धा परीक्षांकडे वळत आहेत. त्यामुळे पुण्यात एक लाखाच्या आसपास तर राज्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या सहा ते सात लाखांवर गेली आहे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नोकरीच्या संधी या एक हजारात देखील उपलब्ध होत नाहीत. त्यात देखील जागा उपलब्ध झाल्या तर परीक्षा वेळेत होत नाही. परीक्षा झाली तर निकाल वेळेत लागत नाही आणि लागलाच निकाल लवकर तर वर्षे-दोन वर्षे नियुक्ती मिळत नाही.

त्यामुळे स्पर्धा परीक्षार्थी वैफल्यग्रस्त झाले असून काही तरुण टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहेत. शाश्वत नोकरीच्या संधी कमी झाल्यामुळे प्रत्येक तरुण ज्याठिकाणी अशा प्रकारच्या नोकर्‍या उपलब्ध आहे त्या ठिकाणी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. एमपीएससी हा त्यातीलच एक भाग आहे. सध्या प्राध्यापकाची नोकरी मिळत नाही.

त्यामुळे सेट, नेट, पीएचडी झालेले अनेक प्राध्यापक देखील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पदवी-पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विषयांच्या क्षेत्रात नोकरीच्या संधी शोधाव्यात आणि त्या ठिकाणी नोकरी करीत किंवा अन्य व्यवसाय करीत प्लॅन बी म्हणून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा; जेणेकरून अपयश आले तरी नैराश्य येणार नाही आणि नोकरीसाठी जीवघेणे टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ येणार नाही.

नोकर्‍यांची माहिती मिळणे गरजेचे
खासगी उद्योग किंवा शासकीय आस्थापनांमध्ये नोकरीच्या नेमक्या संधी कुठे आहेत, याची कोणतीही माहिती तरुणांना नसते. त्यामुळे राज्य सरकारने शासनाच्या विविध विभागांकडून उपलब्ध जागांची माहिती घेऊन संबंधित जागा त्याचबरोबर खासगी उद्योगांकडून त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या नोकरीच्या जागा विविध माध्यमांमधून जाहीर करणे गरजेचे आहे. त्यासाठी खासगी उद्योगांना देखील किती तरुणांना रोजगाराची संधी आहे, याची सांख्यिकी माहिती देणे बंधनकारक करावे. ज्यामुळे पात्र उमेदवार संबंधित ठिकाणी नोकरी करतील आणि ठरावीक एकाच क्षेत्रात नोकरीसाठी जीवघेणी स्पर्धा निर्माण होणार नाही.

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा वाढता टक्का
पुण्यात एका संस्थेच्या माध्यमातून नुकत्याच एमपीएससीच्या
लेखी परीक्षा पात्र असलेल्या पावणेदोनशे परीक्षार्थींच्या सराव
मुलाखती पार पडल्या. यातून धक्कादायक माहिती समोर आली. मुलाखत दिलेले तब्बल 70 टक्के परीक्षार्थी मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेले आढळून आले. संबंधित विद्यार्थ्यांना तुम्ही स्पर्धा परीक्षांकडे का वळले, असे विचारले असता, मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर संबंधित क्षेत्रात नोकर्‍या उपलब्ध नसल्यामुळे स्पर्धा परीक्षांकडे वळल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उरलेल्या 30 टक्केमध्ये अभियांत्रिकीमधीलच इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल, सिव्हिल इंजिनिअरिंगचे तर काही फार्मसीचे विद्यार्थी देखील होते. त्यामुळे उच्च शिक्षित तरुण त्यांचे क्षेत्र सोडून स्पर्धा परीक्षा देत असल्यामुळे जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे.

गेले दहा दिवस पुण्यातच एमपीएससीच्या लेखी परीक्षांमध्ये पात्र झालेल्या विद्यार्थ्यांनी मुलाखतीची तयारी कशी करावी, यासाठी सराव मुलाखत घेत आहे. यामध्ये असे लक्षात आले की, एमपीएससी करणारे विद्यार्थी हे 'प्लॅन बी' म्हणूनच स्पर्धा परीक्षा करत आहेत. कारण, त्यांनी ज्या अभ्यासक्रमांचे पदवी किंवा पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले आहे. त्या ठिकाणी त्यांना कोठेही चांगल्या नोकरीची संधी मिळत नाही. त्यामुळे नाइलाजास्तव शाश्वत नोकरी म्हणून स्पर्धा परीक्षांकडे विद्यार्थी वळत आहेत. याकडे सरकारने गांभीर्याने पाहून युवकांच्या नोकर्‍यांचा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे.

                                – डॉ. अरुण अडसूळ, माजी सदस्य, महाराष्ट्र लोकसेवा आयोग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT