पुणे

पिंपरी : ईव्हीएमची ने-आण करणार्‍या वाहनांमध्ये जीपीएस सिस्टीम

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक व्होटर मशिनवर (ईव्हीएम) येत्या रविवारी (दि.26) मतदान होत आहे. स्ट्राँग रूममधून मतदान केंद्रांवर मशिन नेताना आणि मतदान झाल्यानंतर मशिन पुन्हा स्ट्राँग रूमपर्यंत आणून जमा करणार्‍या वाहनांवर जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम) ही ट्रॅकींग सिस्टीम बसविण्यात आली आहे. त्यामुळे वाहन कोणत्या मार्गाने कसे, कोठे गेले, कोठे थांबले, त्याची सविस्तर माहिती निवडणूक विभागाकडे असणार आहे. त्यामुळे मईव्हीएमफमधील घोटाळ्यास लगाम बसून, ते पूर्णपणे सुरक्षित असतील, असा दावा निवडणूक अधिकार्‍यांनी केला आहे.

चिंचवड हा सर्वांत मोठा विधानसभा मतदारसंघ आहे. मतदारसंघात एकूण 5 लाख 68 हजार 954 मतदार आहेत. तर, एकूण 510 मतदान केंद्र आहेत. त्यासाठी राखीव धरून एकूण 714 ईव्हीएम मशिन लागणार आहेत. मतदान येत्या रविवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत होणार आहे. त्यासाठी आदल्या दिवशी शनिवारी (दि. 25) मतदान केंद्रांचे सर्व साहित्यासह ईव्हीएम मतदान अधिकार्‍यांकडे सुपूर्द केले जाणार आहे. ते साहित्य संबंधित मतदान केंद्रांवर निवडणूक विभागाने नेमलेल्या वाहनांतून नेले जाते. ईव्हीएम वाहतुकीसाठी पीएमपीएलचे एकूण 102 व राखीव 5 बसेस आहेत. तसेच, सेक्टर ऑफीसरसाठी 47 जीप आहेत.

इतर अधिकार्‍यांसाठी 12 जीप आहेत. ईव्हीएम दुरूस्त करणारे भेल कंपनीच्या इंजिनिअरसाठी 4 जीप आहेत. 6 जीप राखीव आहेत. असे एकूण 176 वाहने आहेत. या सर्व वाहनांमध्ये जीपीएस सिस्टीम बसविण्यात आली आहे. थेरगाव येथील शंकरराव गावडे कामगार भवनात स्ट्राँगरूम बनविण्यात आली आहे. तेथून शनिवारी मतदानाचे साहित्य व ईव्हीएम मतदान केंद्र अधिकार्‍यांकडे सुपूर्द केले जाणार आहे. पीएमपीएल व इतर वाहनांतून ते साहित्य नियुक्त केलेल्या मतदान केंद्रांवर नेले जाणार आहे. रविवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सायंकाळनंतर ईव्हीएम थेरगावच्या स्ट्राँगरूममध्ये जमा करायचे आहे. ईव्हीएम वेळेत थेरगाव येथे आणले जावे म्हणून त्या वाहनांमध्ये जीपीएस बसविण्यात आले आहे. प्रत्येक वाहनांवर वॉच असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.

ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी जीपीएस सिस्टीम
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या 510 मतदान केंद्रांसाठी ईव्हीएम यंत्रे पाठविली जाणार आहेत. मतदान झाल्यानंतर ते पुन्हा थेरगाव येथील स्ट्राँगरूममध्ये जमा केले जाणार आहे. ईव्हीएमची ने-आण करणार्‍या वाहनांवर जीपीएस सिस्टीम बसविण्यात आली आहे. त्यामुळे वाहन ठरलेल्या मार्गावरून ये-जा करून वेळेत थेरगावमध्ये दाखल होतील. निवडणूक कार्यालयातील डॅश बोर्डवरून प्रत्येक वाहनांवर लक्ष ठेवले जाणार आहे. एखादे वाहन वेगळ्याच मार्गाने जात असल्यास लगेच स्वतंत्र पथकामार्फत त्यांची तपासणी केली जाईल. परिणामी, ईव्हीएमची सुरक्षा राखणे सुलभ होणार आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT