पिंपरी : केंद्र सरकारच्या भांडवल धार्जिण्या धोरणाच्या विरोधात देशातील पन्नास कोटी असंघटित कामगार कष्टकरी जनता त्रस्त आहेत. यासाठी जनतेच्या मनातील रोष व्यक्त करण्यासाठी 6 मार्च 2023 रोजी दिल्लीत ऑटो टॅक्सी, बस, ट्रक ट्रान्सपोर्ट फेडरेशनतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. भाजप सरकारच्या विरोधात हे आंदोलन असून, सरकार हे आंदोलन मोडीत काढण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप, फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे केला. कांबळे म्हणाले की, आम्ही कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेणार नाही. भारतातील 25 कोटी चालक-मालक आपल्या हक्कासाठी मैदानात उतरले आहेत, देशातील पन्नास कोटी असंघटित कामगार मजूर ऑटो टॅक्सी बस ट्रकचालक सरकारच्या धोरणांमुळे त्रस्त आहेत, पण केंद्र आणि राज्य सरकार लक्ष देत नाही.
त्यामुळे सर्वांच्या मनात सरकारविरोधात रोष आहे. ज्याप्रमाणे देशातील शेतकर्यांनी दिल्लीत केंद्र सरकारच्या धोरणांना कडाडून विरोध केला. त्याच पद्धतीने देशभरातील ऑटो टॅक्सी बस टेम्पोचालक-मालक प्रतिनिधी सरकारचा निषेध करत आहेत. याची सरकारला धास्ती आहे. त्यामुळे आंदोलनाची दिशाभूल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत! काही संघटना आधी आमच्या आंदोलनाला पाठिंबा देत होत्या. परंतु त्यांनी सध्या पाठींबा जाहीर केला नाही. तरीही आपण सर्वजण एकजुटीने आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या मागण्या जाहीर करत आहोत, अशी माहिती कांबळे यांनी दिली.