बारामती: बारामती नगरपरिषदेत नुकताच लाचखोरीचा प्रकार समोर आला; मात्र हा प्रकार केवळ नगरपालिकेपुरता मर्यादित नसून शासनाच्या सर्वच कार्यालयात चिरीमिरी घेणार्यांची संख्या सर्वाधिक आहे. याशिवाय अनेक कार्यालयांमध्ये एजंटांचाही सुळसुळाट झाला आहे. एजंटशिवाय कोणतेही काम होत नसल्याने बारामती तालुक्यातील नागरिक हैराण झाले आहेत. शासनाचे अधिकारी व कर्मचारी एजंटकडून आलेलेच काम मार्गी लावत आहेत, तर थेट गेल्यावर हेलपाटे मारायला लावत आहेत.
बारामती शहरातील प्रशासकीय भवनातील काही कार्यालयांसह अन्य कार्यालयातही एजंटांचा मुक्त वावर आहे. विशेष म्हणजे पोलिस ठाण्यांच्या आजूबाजूला देखील या एजंटांची संख्या वाढली आहे. एजंटशिवाय कोणतेच काम होत नाही. काही एजंट तर स्वतःच अधिकारी असल्यासारखे वागत असतात. प्रत्येक कार्यालयात अनेक एजंटाची उठबस असते. कार्यालय बंद झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत या कार्यालयात अनेकदा कामे सुरु असतात. नेमकी रात्री कोणती कामे केली जातात हे न उलगडणारे कोडे आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे यासंबंधी साततत्याने अधिकार्यांना तंबी देतात. पक्षाच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकार्यांना तसेच अधिकार्यांना चांगले वागून सर्वसामान्यांची कामे करण्याची सूचना देतात; मात्र त्यांच्या बोलण्याकडे बारामती तालुक्यातील शासकीय अधिकारी कायमच दुर्लक्ष करत आलेले आहेत. वारंवार तंबी देऊनही बारामतीतील सरकारी अधिकारी आणि कर्मचार्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव होत नाही ही वस्तुस्थिती आहे.
सर्वच शासकीय कार्यालयांच्या ठिकाणी वाढलेला भ्रष्टाचार आणि पडलेला एजंटांचा विळखा यामुळे सर्वसामान्य बारामतीकरांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पैसे दिल्याशिवाय कोणतेच काम होत नसल्याने नेमकं सरकार कोणत्या योजना फुकट देत आहेत, याबद्दलही जनतेच्या मनात आता सवाल उठू लागले आहेत. वास्तविक अधिकार्यांनी खुर्च्या सोडल्या तर शेतकर्यांचे, सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागतील; मात्र बारामतीत असे प्रकार होताना दिसत नाहीत.
तालुक्यासह शहरातील पोलिस ठाण्यातही स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणून घेणार्यांची उठबस वाढली आहे. काही अवैध धंदेवाल्यांकडून एजंटाकरवी पोलिसांना पैसे दिले जातात. अवैध धंदे सुरु राहावेत यासाठी मध्यस्थी करणार्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे, यावर उपाययोजना करणे तर दूरच पोलीसच अशांना पाठीशी घालत आहेत.
त्यामुळे बारामती तालुक्यात दिवसेंदिवस भ्रष्टाचाराची कीड वाढत चालली आहे. यातून अनेक अधिकार्यांनी मोठी माया जमवली असल्याची चर्चा तालुक्यात होत आहे. नगरपरिषदेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्यानंतर तरी अन्य विभागांनी त्यातून धडा घ्यावा अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे.
शासकीय कार्यालयांना एजंटांचा विळखा
वरिष्ठ अधिकार्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे बारामती तालुक्यातील सर्वच शासकीय कार्यालयाला एजंटचा विळखा पडला आहे. केवळ हेलपाटे मारायचे का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे. तालुक्यात एकीकडे बोकाळलेली ठेकेदारी वाढत असतानाच शासनाच्या अधिकार्यांकडून अपेक्षा करणार्या सर्वसामान्य नागरिकांना मात्र त्रासाला सामोरे जावे लागत आहे.