पुणे

मंचर : आमदारांचे लाड पुरवण्यासाठी सरकारकडे वेळ : माजी मंत्री सचिन अहिर यांची खोचक टीका

अमृता चौगुले

मंचर (ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : सरकारला आमदारांचे लाड पुरवण्यात वेळ आहे; मात्र शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही, अशी खोचक टीका माजी मंत्री सचिन अहिर यांनी सरकारवर केली. घोडेगाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची येणार्‍या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक झाली. त्या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माजी मंत्री सचिन अहिर बोलत होते.

व्यासपीठावर पुणे जिल्हा समन्वयक रवींद्र मिर्लेकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोर, संपर्कप्रमुख राजाराम बाणखेले, ज्येष्ठ नेते दिलीप घोडेकर, जयश्रीताई पलांडे, माजी सरपंच दत्ता गांजाळे, तालुकाप्रमुख दिलीप पवळे, उमेश पांचाळ, प्रसन्ना डोके, श्रद्धा कदम, कलावती पोटकुले, संदीप शिंदे, सोनाली पांचाळ आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी अहिर म्हणाले, जनतेचा राज्य सरकारवर विश्वास राहिला नसून महाराष्ट्राच्या सीमेवर असणारी गावे ग्रामसभेत ठराव करून कर्नाटकमध्ये जाण्याचा निर्णय घेत असून सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत आहे.

कोण आपल्याबरोबर व कोण आपल्याविरोधात हे पाहण्यापेक्षा येणार्‍या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत निवडणुकीच्या कामाला लागा, यश निश्चित आपले आहे, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. पुणे जिल्हा समन्वयक रवींद्र मिर्लेकर म्हणाले, पक्ष कार्य करताना कोणाला घाबरू नये. येणार्‍या निवडणुकांमध्ये यश निश्चित आहे. त्यासाठी पक्ष संघटना मजबूत करण्याची गरज आहे. या वेळी पुणे जिल्हाप्रमुख सुरेश भोर, तालुकाप्रमुख दिलीपराव पवळे, घोडेगाव शहरप्रमुख नंदकुमार बोर्‍हाडे, उमेश पांचाळ, बाळासाहेब वाघ, सूरज हिंगे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रसन्न लोखंडे यानी केले. तालुकाप्रमुख दिलीप पवळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT