पुणे : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण...सगळीकडे दिवे-पणत्यांचा लख्ख प्रकाश आणि आनंदाची, उत्साहाची नवलाई... याच मंगलपर्वाला उद्या, शुक्रवारपासून (दि. 17) सुरुवात होत आहे. भारतीय संस्कृती कृषीप्रधान असल्याने गाय आणि वासराच्या पूजन व नैवेद्य दाखवून आनंदोत्सवाला प्रारंभ होणार आहे. रांगोळ्याच्या मनोहारी पायघड्या, आकर्षक सजावट, आकाशकंदील, दिवे-पणत्यांच्या प्रकाशाने अवघे शहर उजळणार आहे. वसुबारसची घरोघरी तयारी पूर्ण झाली. मठ-मंदिरांमध्ये दिवे-पणत्या प्रज्वलित केल्या जाणार आहेत.(Latest Pune News)
वसुबारस म्हणजेच गायी आणि तिच्या वासराचे पूजन करण्याचा दिवस. यादिवशी ‘दिन दिन दिवाळी गायी-म्हशी ओवाळी’ म्हणत गाय आणि वासरू यांची पूजा केली जाते. वसुबारसच्या पूर्वसंध्येला गुरुवारी खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती.
दिवाळीच्या निमित्ताने सगळीकडे चैतन्य पसरले आहे. दिवाळीचा पहिला दिवस असल्याने आकाशकंदील आणि नक्षीदार रांगोळीही अंगणात काढण्यात येणार आहे. वसुबारसच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून (एकवेळ जेवण करून) सायंकाळी सूर्यास्तानंतर गाय-वासराचे पूजन करणार आहेत.
आज शहरात अनेक ठिकाणी पूजनासाठी गाय-वासरू उपलब्ध नसतात, अशावेळेस गाय-वासराच्या मूर्तीची अथवा प्रतिमेची पूजा करण्यात येणार आहे. पारंपरिक वेशभूषेत गाय-वासराचे पूजन होणार आहे. विविध गोशाळांमध्ये जाऊन स्त्रिया पूजन करणार आहेत. वसुबारसनिमित्त सायंकाळी घरांमध्ये, मंदिरांमध्ये दिवे, पणत्या लावण्यात येतील आणि यानिमित्ताने घरोघरी सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य नांदो, अशी प्रार्थना करण्यात येणार आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी घराघरांमध्ये पंचपक्वानांची मेजवानी रंगणार आहे आणि मंदिर परिसरही विद्युत रोषणाई, रंगबिरंगी पताका आणि आकाशकंदीलांच्या प्रकाशाने उजळणार आहे. भाविक मंदिरांत जाऊन दर्शन घेणार असून, मंदिरांत भजन-कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रम होतील.
वसुबारसच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून (एकवेळ जेवण करून) सायंकाळी सवत्स म्हणजे वासरासह असलेल्या गायीचे सूर्यास्तानंतर पूजन करतात. या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. आज शहरात अनेक ठिकाणी पूजनासाठी गायी उपलब्ध नसतात, अशावेळेस गाय-वासराच्या मूर्तीची देखील पूजा करता येते. तेही शक्य नसल्यास गायीच्या चित्राची पूजा करता येते. मात्र अशा वेळेस गायीच्या गोग््राासाकरिता म्हणून आपल्या भागातील गोशाळेस शक्य ते सहकार्य करावे.मोहन दाते, दाते पंचांगकर्ते