पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅमला 60 हजार रुपयांवर जाऊन पोहोचले होते. मात्र, बुधवारी (दि. 22) या दरामध्ये जवळपास एक हजार रुपयांची घसरण झाली. त्याचा फायदा घेत नागरिकांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीचा; तसेच गृहखरेदी बुकिंगचा योग साधला. साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहूर्त मानल्या जाणार्या गुढीपाडवा सणानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील सराफा बाजारात दिवसभरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली.
चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला गुढीपाडवा सण साजरा करण्यात येतो. या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते. या दिवशी सोने खरेदीला विशेष महत्त्व असते. एक ग्रॅमचे का होईना पण सोने खरेदी करण्याला नागरिक प्राधान्य देत असतात. तर काहीजण मोठ्या दागिन्यांची खरेदी करतात. गुढीपाडव्याच्या दिवशी सोने खरेदी करणे लाभदायक आणि शुभ मानले जाते. त्यामुळे हा मुहूर्त साधत सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करण्याकडे महिला वर्गाचा कल पाहण्यास मिळाला.
त्यातही सध्या लगीनसराई सुरू असल्याने अॅन्टीक वेडिंग ज्वेलरीतील दागिन्यांना विशेष पसंती मिळत होती. त्याशिवाय, टेंपल ज्वेलरीचीदेखील खरेदी सुरू होती. दागिन्यांमध्ये छोटे आणि मोठे गंठण, अंगठी, कर्णफुले, झुमके, मोहनमाळ, चंद्रहार, गोफ अशा विविध दागिन्यांना मागणी होती. त्याशिवाय, डायमंडमधील अंगठ्याही महिला वर्गाचे लक्ष वेधून घेत होत्या. शहरात 400 पेक्षा अधिक सराफ व्यावसायिकांची दुकाने आहेत. त्यांची दिवसभरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली.
सोन्याच्या भावातील घसरणीचा फायदा
24 कॅरेट सोन्याचे भाव गेल्या दोन दिवसांत प्रति दहा ग्रॅममागे 60 हजारांवर जाऊन पोहोचले होते. पिंपरी-चिंचवडमधील सराफा बाजारात बुधवारी या दरामध्ये जवळपास एक हजार रुपयांची घसरण पाहण्यास मिळाली. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅमचा दर 58 हजार 900 रुपये इतका होता. तर, 22 कॅरेटचा प्रति दहा ग्रॅमचा दर 55 हजार 500 रुपये इतका होता.
दर उतरल्याने त्याचा फायदा घेत महिला वर्गाने विविध दागिन्यांची खरेदी करण्यास प्राधान्य दिले. चांदीचा दर प्रतिकिलोमागे 68 हजार 700 रुपये इतका होता. खास लगीनसराईसाठी बाऊल, ग्लास आणि थाली सेट यांची खरेदी करण्यात येत होती. त्याचप्रमाणे, चांदीतील देव आणि महिला वर्गाकडून पैंजण खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला.
गुढीपाडवा सणामुळे अॅन्टीक आणि टेंपल ज्वेलरीची महिला वर्गाकडून खरेदी करण्यात आली. सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीचा फायदा घेत सोन्याच्या विविध दागिन्यांची खरेदी करण्यात आली. यापुढील काळात सोन्याच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
– लखीचंद कटारिया, सराफ व्यावसायिक
गुढीपाडवा सणानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीस चांगला प्रतिसाद मिळाला. सोन्यामध्ये टेंपल ज्वेलरीबरोबर अॅन्टीक वेडिंग ज्वेलरीस चांगली मागणी होती. चांदीमध्ये पैंजण, खास लगीनसराईसाठी विविध बाऊल सेटची खरेदी करण्याकडे महिला वर्गाचा कल होता.
– राहुल चोपडा, सराफ व्यावसायिक