पुणे: अमेरिकेच्या शुल्कवाढीमुळे निर्माण झालेली अनिश्चितता, शेअर बाजाराची होणारी पडझड, यामुळे सोन्यातील गुंतवणूक वाढली आहे. परिणामी, मंगळवारी (दि. 1) 10 ग्रॅम शुद्ध सोन्याचा भाव 93 हजार 800 रुपयांवर गेला.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘जशास तशी’ आयात शुल्क आकारणीची घोषणा केली आहे. याची अंमलबजावणी 2 एप्रिलपासून होणार आहे. परिणामी, जागतिक व्यापारात अनिश्चितता निर्माण झाली आहे.
त्यामुळे भारतीय शेअर बाजारही सलग दुसर्या सत्रात खाली आला. वाढत्या अनिश्चिततेमुळे शुद्ध सोन्याच्या भावात 25 मार्चपासून 10 ग्रॅममागे साडेतीन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. तर, चांदी किलोमागे चार हजार रुपयांनी महागली आहे.
सोन्या-चांदीचे व्यावसायिक वस्तुपाल रांका म्हणाले, जागतिक व्यापार अनिश्चितता आणि शेअर बाजारातील पडझडीमुळे आश्वासक गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे. गुंतवणूकदारांकडून सोन्याला मागणी वाढल्याने 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 91 हजार रुपयांवर गेला आहे.
तर, वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) तीन टक्के दर गृहीत धरल्यास सोन्याचा दर 93,800 रुपये होतो. तर, 22 कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅमचा भाव जीएसटीसह 88,500 रुपयांवर गेला आहे. चांदीचा एका किलोचा दर 1 लाख 5 हजारांवर गेला आहे. सोन्याचा हा आत्तापर्यंतचा उच्चांकी दर आहे.