पुणे

आढे येथील गोदाम महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प ! मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषप्रसाद यांचा दावा

अमृता चौगुले

वडगाव मावळ : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत आढे ग्रामपंचायतच्या माध्यमातून बांधलेला गोदाम प्रकल्प हा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प असल्याचा दावा करून हा प्रकल्प इतर ग्रामपंचायतींसाठी आदर्श ठरेल असा विश्वास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषप्रसाद यांनी व्यक्त केला.

आढे येथे ग्रामपंचायतच्या माध्यमातून सरपंच सुनीता ज्ञानेश्वर सुतार यांच्या संकल्पनेतून रोजगार हमी योजनेअंतर्गत गोदाम उभारण्यात आले आहे, या गोदामसह गावात करण्यात आलेल्या सुमारे 3 कोटी 75 लक्ष रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे उदघाटन आयुषप्रसाद, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, जिल्हा परिषद माजी सभापती बाबुराव वायकर, भाजपचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर, माजी पंचायत समिती सभापती दीपक हुलावळे, शिवसेना तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

आयुषप्रसाद पुढे म्हणाले, 'हा गोदाम प्रकल्प पथदर्शी ठरणारा असून गावातील शेतकरी, लघुउद्योजक, महिला बचत गट यासाठी याचा उपयोग होईल तसेच ग्रामपंचायतीला वार्षिक सुमारे 6 लाखांपर्यंत कायमस्वरूपी उत्पन्न सुरू होईल असा विश्वास व्यक्त केला. खासदार बारणे यांनीही या प्रकल्पाचे कौतुक करून ग्रामपंचायतीने केलेल्या विकासकामांचे कौतुक केले.

आमदार सुनील शेळके म्हणाले, 'सरपंच सुतार यांच्यासह सर्व पदाधिकार्‍यांनी लोकप्रतिनिधी म्हणून पक्षपात न करता ज्यांच्याकडुन निधी मिळेल तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला व त्यामुळे गावात तब्बल 4 कोटींपर्यंत निधी आला असा उल्लेख करून ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांची ही चिकाटी गावच्या विकासासाठी फायदेशीर ठरत असल्याचा विश्वास व्यक्त केला. बाबूराव वायकर यांनीही ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांच्या चिकाटीमुळे गावाचा विकास होत असल्याचे मत व्यक्त केले

सरपंच सुनीता सुतार, उपसरपंच बाबा हिंगडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर (पिंटू) सुतार, ग्रामपंचायत सदस्य संगीता सुतार, जालिंदर बोत्रे, मैना ठाकर, मच्छिंद्र सुतार, भामाबाई सुतार, ग्रामसेवक अमोल कोळी, माजी उपसरपंच युवराज ठाकर, पोलीस पाटील सुभाष ठाकर आदींनी संयोजन केले, सरपंच सुतार यांनी प्रास्ताविक केले, शिवाजी ठाकर यांनी सूत्रसंचालन केले, तर ग्रामसेवक कोळी यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT