पुणे; पुढारी वृत्तसेवा : बदलत्या जीवनशैलीमध्ये अनेक आजार कमी वयातच बळावू लागले आहेत. आजारांना दूर ठेवण्यासाठी निरोगी जीवनशैली अवलंबावी आणि त्यासाठी जोडीदाराला व्यायामासाठी प्रोत्साहन, चॉकलेटसऐवजी सुकामेवा, नियमित तपासण्यांचे पॅकेज अशी आरोग्यदायी भेट द्यावी, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
'व्हॅलेंटाईन डे'निमित्त एकमेकांना भेटवस्तू देऊन प्रेम व्यक्त करण्याचा प्रघात आहे. पुष्पगुच्छ, टेडी बेअर, चॉकलेटस, वस्तू अशा विविध माध्यमांतून व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. चौकटीतील भेटवस्तूंच्या पलीकडे जाऊन काहीतरी हटके भेटवस्तू दिल्यास व्हॅलेंटाईन डेचा आनंद द्विगुणित होऊ शकतो.
सध्या बाजारात ग्रीन टीच्या विविध फ्लेवरचे पॅक, आकर्षक स्वरुपात सुका मेव्याचे बॉक्स, फळांच्या परड्या असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. याशिवाय, प्रत्येक वयोगटात काही तपासण्या नियमितपणे करून घेतल्यास आजारांचे लवकर निदान आणि उपचार करता येतात. त्यामुळे प्रियकर-प्रेयसी, पती-पत्नी अथवा एकमेकांवर प्रेम करणा-या कोणत्याही दोन व्यक्ती एकमेकांना तपासण्यांचे पॅकेज भेटस्वरुपात देऊ शकतात. अशा भेटवस्तू देणे थोडे विचित्र आणि चाकोरीबाहेरचे वाटत असले तरी आरोग्यदायी आहे, असे मत डॉ. अनुजा देशपांडे यांनी व्यक्त केले.
निरामय आयुष्यासाठी योग्य आहार, व्यायाम, पुरेशी झोप महत्त्वाची असते. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने ही त्रिसूत्री अवलंबण्यासाठी जोडीदार एकमेकांना प्रोत्साहन देऊ शकतात. एकमेकांच्या सोबतीने व्यायामाला सुरुवात केल्यास त्यामध्ये सातत्य राहण्यासही मदत होते.
– डॉ. दिनेश जगताप, आहारतज्ज्ञ