राजगुरूनगर: खेड तालुक्यातील रोहकल येथील गायरान जागेवर वास्तव्य करणार्या ठाकर समाजातील 21 पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल बांधण्यासाठी 30 गुंठे जागा देण्याचे लेखी आदेश खेड प्रांताधिकारी अनिल दौंडे यांनी दिले.
रोहकल येथील गायरान जमीन पुणे ‘म्हाडा’ला देण्याचा विषय समोर आल्यावर या जागेवर शंभर वर्षांपासून शंभर-दीडशे ठाकर कुटुंबे वास्तव्य करीत असल्याचा विषय जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासमोर आल्यानंतर त्यांनी प्रांताधिकारी यांना सूचना देऊन या ठाकर समाजाच्या जागेच्या मागणीचा प्रस्ताव मंजूर करण्यास सांगितले. (Latest Pune News)
‘म्हाडा’ला अल्पोत्पन्न गटातील लोकांसाठी घरे बांधण्यासाठी रोहकल येथील ही जागा देण्यात आली आहे. या सरकारी जागेवर गेल्या शंभर वर्षांपासून ठाकर समाजाची वस्ती आहे. शासनाने या ठिकाणी ठाकर समाजाला सर्व सार्वजनिक सोयी-सुविधा देखील पुरविल्या आहेत. शंभर वर्षांपासून या लोकांचे वास्तव्य बेकायदेशीर होते. परंतु, अखेर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी लक्ष घातल्याने या 21 कुटुबांना आता हक्काचे घर मिळणार आहे.
रोहकल येथील गायरान जमीन जिल्हाधिकार्यांनी ‘म्हाडा’ला दिली असली, तरी या जागेत गेल्या शंभर वर्षांपासून राहात असलेल्या ठाकर समाजाच्या लोकांना कोणी विस्थापित करणार नाही. एका बाजूला सर्व ठाकर समाजाला घरे बांधून देण्यात येतील. =- अनिल दौंडे, खेड, प्रांताधिकारी