पुणे: वाढते अपघाती मृत्यू रोखण्यासाठी वाहन खरेदी करणार्या ग्राहकांना दोन हेल्मेट पुरविण्याच्या वितरकांना सूचना पुणे आरटीओकडून नुकत्याच देण्यात आल्या आहेत. त्यामुळे दुचाकी खरेदी करताना ग्राहकांनी वाहन विक्रेत्यांकडून दोन हेल्मेट घ्यावेत, असे आरटीओकडून सांगण्यात आले आहे.
शहरासह राज्यभरात हेल्मेट परिधान न करणार्या दुचाकीस्वारांचेच अपघातावेळी मृत्यू होत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून दुचाकी वाहनचालकांना सातत्याने हेल्मेट परिधान करण्याच्या सूचना केल्या जात आहे.
त्यांच्यात हेल्मेटबाबतची जनजागृतीदेखील केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून वितरकांना केंद्रीय मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार दुचाकीस्वारांना वाहन खरेदी करताना दोन हेल्मेट देण्याच्या सूचना प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील आदेश नुकतेच प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे यांच्याकडून काढण्यात आले आहेत.
दुसर्या व्यक्तीनेही हेल्मेट घालावे
दुचाकीस्वारांनी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर केल्यास अपघातामध्ये होणार्या मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे वाहनचालक आणि सोबत बसलेल्या व्यक्तीनेही रस्ता सुरक्षा मानकांची पूर्तता करणार्या हेल्मेटचा वापर करणे अत्यावश्यक आहे, अशी माहिती भोसले यांनी दिली आहे.
केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 मधील नियम 198 अन्वये नवीन दुचाकी वाहन खरेदी करणार्या ग्राहकांना खरेदीच्यावेळी वाहन वितरकाने दोन हेल्मेट पुरविण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार ग्राहकांनी नवीन दुचाकी वाहन खरेदी करताना वितरकांकडून दोन हेल्मेट घ्यावेत.- स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
ग्राहकांना गाडी विकताना आम्ही त्यांच्याकडे सुरुवातीला हेल्मेट आहे की नाही, याबाबत विचारणा करतो. त्यानंतर ज्या ग्राहकाकडे हेल्मेट नाही, अशा ग्राहकांना ते तत्काळ पुरवतो. ज्या ग्राहकाकडे अगोदरच हेल्मेट आहे, त्यांचा लेखी अर्ज भरून घेतो.- एक वाहन विक्रेते