पुणे

चाकण : संकेतस्थळाच्या पत्रकाराकडून प्रेयसीचा खून

अमृता चौगुले

चाकण; पुढारी वृत्तसेवा : 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहणार्‍या परप्रांतीय प्रेयसीचा खून करून एका संकेतस्थळाच्या तथाकथित पत्रकाराने मृतदेह खेड तालुक्याच्या केळगाव हद्दीत नदीपात्रात टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भोसरीतील संकेतस्थळाच्या पत्रकारास अटक करण्यात आली आहे. सुमारे तीन महिन्यांनंतर खुनाचा प्रकार उघड झाला आहे. रामदास पोपट तांबे (वय 30, रा. दिघी रस्ता, भोसरी; मूळ रा. अहमदनगर) असे या पत्रकाराचे नाव आहे. चंद्रमा सिमांचल मुनी (वय 28, मूळ रा. ओडिशा) असे मयत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी भोसरीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामदास आणि चंद्रमा भोसरीत एकत्र राहत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होते. काही कारणास्तव चंद्रमा ही रामदासला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत होती. तिच्या सततच्या त्रासाला कंटाळून रामदासने तिला जिवे मारण्याचा कट रचला. 3 ऑगस्ट रोजी चंद्रमाचा गळा आवळून खून करून तिचा मृतदेह खेड तालुक्यातील केळगाव येथे नदीपात्रात टाकून दिला. याप्रकरणी रामदास याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याने खुनाची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

बोगस पत्रकारांचा विषय ऐरणीवर
बोगस पत्रकारांचा खूप मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट झाला आहे. कुठल्याही शासकीय आधाराशिवाय चालविल्या जाणार्‍या बोगस पोर्टलच्या माध्यमातून पत्रकार म्हणून मिरवून अनेक जण वेगवेगळे धंदे करीत असल्याचे प्रकार मागील काही दिवसांत समोर आले आहेत. पत्रकार म्हणून मिरवून अनेक शासकीय कार्यालयांत त्यांची ऊठबस असते. वेगवेगळ्या सेटलमेंट त्यांच्याकडून घडविल्या जातात. त्यामुळे बोगसगिरी, ब्लॅकमेलिंग, पैसे घेऊन असामाजिक प्रवृत्ती आणि गुन्हेगारांचे उद्दात्तीकरण करणार्‍या बोगस पत्रकार मंडळींना पोलिसांनी वेळीच चाप लावण्याची गरज निर्माण झाली आहे.

SCROLL FOR NEXT