Girish Mahajan case
गिरीष महाजन प्रकरणात पोलिस अधीक्षक मुंढेंवर देशमुखांचा दबाव धक्कादायक असल्याची माहिती समोर आली आहे. File Photo
पुणे

Girish Mahajan : गिरीष महाजन प्रकरणात पोलिस अधीक्षक मुंढेंवर होता अनिल देशमुखांचा दबाव

पुढारी वृत्तसेवा

पुणे : भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यासह २९ जण आरोपी असलेल्या प्रकरणात केंद्रिय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) क्लोजर रिपोर्ट न्यायालयात दाखल केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. जळगावचे तत्कालीन पोलिस अधीक्षक प्रविण मुंढे यांच्यावर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणला याबाबत म्हटले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोपावरून एकच खळबळ उडाली आहे.

जळगावमधील एक शैक्षणिक संस्था ताब्यात घेण्यासाठी संस्थेच्या संचालकाचे अपहरण व खंडणीच्या आरोपावरून कोथरुड पोलिस ठाण्यात तीन वर्षापूर्वी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासह 29 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. पुढे या गुन्ह्याचा तपास सीबीआय देण्यात आला होता.

पहा नेमकं काय आहे प्रकरण

अ‍ॅड.विजय पाटील (वय 52) यांनी कोथरुड पोलिस ठाण्यात जानेवारी 2021 मध्ये फिर्याद दिली होती. त्यावरुन गिरीश दत्तात्रेय महाजन (रा. जामनेर, जळगाव), तानाजी भोईटे (रा. कोंढवा), नीलेश भोईटे, वीरेंद्र भोईटे (रा. भोईटेनगर जळगाव) यांच्यासह 29 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. पाटील हे जळगावमधील जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित शैक्षणिक संस्थेचे संचालक आहेत. संबंधित संस्था महाजन यांना पाहिजे होती, त्यासाठी त्यांनी पाटील यांना एक कोटी रुपये देण्याचे आमिष दाखविले. मात्र, पाटील यांनी त्यास नकार दिला.

दरम्यान, संशयित आरोपींनी पाटील यांना संस्थेसंबंधी कागदपत्रे देण्याचा बहाणा करून पुण्यात बोलाविले. त्यांना व त्यांच्या समवेतच्या एका व्यक्तीला सदाशिव पेठेतील एका सदनिकेत नेऊन दोघांचे हात-पाय बांधून त्यांना डांबुन ठेवले. त्यानंतर त्यांना जबर मारहाण करुन मारहाण करुन गळ्याला, पोटाला चाकू लावला. फिर्यादीने सर्व संचालकांचे राजीनामे आणले नाहीत, तर त्यांना एमपीडीए’च्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत संबंधित व्यक्तींनी त्यांच्याकडून पाच लाख रुपयांची खंडणी घेतली. त्यानंतर फिर्यादीच्या संस्थेत बेकायदा प्रवेश करून कार्यालयाचे दरवाजे तोडून मौल्यवान रेकॉर्ड तसेच संस्थेच्या कर्मचार्‍यांच्या खिशातील पाच हजार रुपये व दोन तोळ्याची चैन तोडून नेली. संस्थेच्या चाव्या जबरदस्तीने हिसकावून घेतल्याचा उल्लेख फिर्यादीमध्ये करण्यात आला होता.

प्रविण मुंढे यांनी सीबीआयला काय म्हटले

पुण्याच्या मोक्का न्यायालयात अनिल देशमुखांविरुद्ध सीबीआयचा अहवाल समोर आला आहे. गिरीश महाजन प्रकरणात सीबीआयने हा अहवाल सादर केला आहे. या अहवालात सीबीआयने अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जळगावचे तत्कालिन पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी आपल्याला अनिल देशमुखांनी धमकी दिल्याचे अहवाल म्हटले आहे.

विजय भास्करराव पाटील यांनी गिरीश महाजनांविरोधात तक्रार दिली होती. तक्रारदार येण्यापूर्वीच अनिल देशमुखांनी मुंढे यांना फोन केला होता. त्यामध्ये विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण तुमच्याकडे येतील आणि माहिती सांगतील, असे म्हटले होते. त्यानंतर प्रविण चव्हाणांनी मुंढे यांची भेट घेत तक्रारीबद्दल सांगत अनिल देशमुखांचे आदेश आहेत गुन्हा दाखल करा, असे मुंढे यांना सांगण्यात आले. त्यावर मुंढे यांनी त्यांना पुणे शहर पोलिसांकडे जाण्यास सांगितले होते. पण तक्रारदाने याला नकार दिल्यानंतर आठवडाभरानंतर अनिल देशमुखांनी मुंढे यांना फोन केला. त्यांनी पुन्हा तक्रारदाराला पाठवतो असं सांगितले. मुंढे यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, याबाबत मुंढे यांनी गृहमंत्र्यांच्या फोनबद्दल नाशिक आयजी, आयजी कायदा-सुव्यवस्था, पोलीस महासंचालक यांना माहिती दिली.

त्यानंतर आठवडाभराने पुन्हा गृहमंत्री देशमुख यांचा मुंढे यांना फोन आला. त्यांनी मुंढे यांना गृहमंत्र्यांना एका गुन्ह्यासाठी तीन फोन करावे लागतात का ? अशी खडसावून विचारणा केल्याचे सीबीआयला दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे. गृहमंत्री सातत्याने दबाब टाकत असल्याने अखेर याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. असे प्रविण मुंढे म्हणाल्याचं सीबीआयच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

SCROLL FOR NEXT