पुणे : गिरिप्रेमी संस्थेतील गिर्यारोहकांनी लडाखमधील नुब्रा व्हॅलीजवळील माउंट दावा या शिखरावर यशस्वी चढाई, तर माउंट सामग्याल शिखरावर 5770 मीटरपर्यंत यशस्वी चढाई केली. संस्थेतील एकूण 10 गिर्यारोहकांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते कृष्णा ढोकले यांच्या नेतृत्वाखाली या संघाचे दोन गट करून एकाच वेळेस दोन्ही शिखरांवर चढाई करण्यात आली. पाच जणांच्या एका गटाने अखिल काटकर याच्या नेतृत्वाखाली 5814 मीटर उंच माउंट दावा शिखरावर यशस्वी चढाई केली यात रोनक सिंग, चिंतामणी गोडबोले, कौशल गद्रे आणि साहिल फडणीस यांचा समावेश होता, तर कृष्णा ढोकले यांच्या नेतृत्वाखाली मनोज कुलकर्णी, श्रवण कुमार, समीर देवरे व अद्वैत देव एकूण पाच जणांनी माउंट सामग्याल या तांत्रिकदृष्ट्या अत्यंत अवघड शिखरावर 5770 मीटर उंचीपर्यंत मजल मारली, येथे शिखरमाथ्या पासून अवघ्या 100 मीटरवर पोहोचूनही सुरक्षिततेच्या कारणास्तव संघाने अत्यंत कठीण पण योग्य असा परत खाली जाण्याचा निर्णय घेतला. (Pune Latest News)
ही जोड मोहिम नुब्रा व्हॅलीच्या निर्जन, कोरड्या व अतिउंचीवरील प्रदेशात पार पडली. जिथे कठीण हवामान, उंची आणि एकाकीपणा हे गिर्यारोहकांसाठी फार मोठे आव्हान ठरते. मोहिमेचा बेस कॅम्प 4600 मीटर तर हाय कॅम्प 5100 मीटर उंचीवर उभारण्यात आला होता. या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे ही मोहिम बेस कॅम्पच्या पुढे संपूर्णपणे स्वयंपूर्ण पद्धतीने पार पडली. गाईड द हिमालय या संस्थेने बेस कॅम्पपर्यंत संघाला साथ दिली व पुढील चढाईसाठी संघाने स्वतःहून लोड फेरी, अन्न नियोजन, चढाई मार्ग ठरवणे ही सर्व कामे स्वतः केली.
दोन्ही गटातील 10 पैकी 7 सदस्य नवोदित गिर्यारोहक असूनही त्यांनी दोन्ही शिखरांवरील अडचणी पार करत मोहीमा पार पडल्या. या दीर्घ आणि थकवणार्या माघारीस जवळपास 12 ते 15 तासांचा वेळ लागला आणि अखेरीस सर्व सदस्य सुरक्षित हाय कॅम्पला परतले. हा निर्णय गिर्यारोहणाच्या मूलभूत मूल्यांची आठवण करून देतो - शिखरापेक्षा प्रत्येक सदस्याची सुरक्षितता नेहमी महत्त्वाची असते. गिरिप्रेमीचे ज्येष्ठ गिर्यारोहक तेनजिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार विजेते उमेश झिरपे यांनी संघाला मार्गदर्शन केले.