Ghorpadi Railway Overbridge Pudhari
पुणे

Ghorpadi Railway Overbridge: घोरपडीतील उड्डाणपूल लवकरच होणार खुला; काम अंतिम टप्प्यात

रेल्वेगेटवरील वाहतूक कोंडीतून नागरिकांची होणार सुटका; काम अंतिम टप्प्यात आल्याने समाधान

पुढारी वृत्तसेवा

मुंढवा: घोरपडी येथील साईबाबा मंदिर रेल्वेगेट रेल्वेउड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि रहिवाशांसाठी प्रतीक्षेचा ठरलेला हा पूल पुढील दोन महिन्यांमध्ये वाहतुकीसाठी खुला होणार असून, त्यामुळे घोरपडी, मुंढवा, केशनवगर, कोरेगाव पार्क आणि परिसरातील नागरिकांची वर्षानुवर्षे होणारी गैरसोय कायमची दूर होणार आहे.

साईबाबा मंदिर रेल्वेगेटच्या ठिकाणी दररोज वाहतूक कोंडी होत आहे. दिवसातून अनेक वेळा रेल्वेगाड्यांच्या येण्या-जाण्यामुळे रेल्वे गेट बंद ठेवावे लागत असल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

सकाळ आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळे या ठिकाणी वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागत आहे. मात्र, आता या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्पात आले आहे. पुढील दोन महिन्यांमध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे महापालिकेच्या प्रकल्प विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यावर वाहनचालकांना रेल्वेगेट उघडण्याची वाट पाहत ताटकळत थांबावे लागणार नाही. या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

महापालिका प्रशासनाकडून कामाला गती

महापालिका प्रशासनाने गेल्या काही महिन्यांत या पुलाच्या कामाचा सातत्याने आढावा घेत कामाला गती दिली आहे. पुलाचे मुख्य स्ट्रक्चर उभे राहिले असून, रेल्वेलाईनच्या वर तयार केलेले गर्डर टाकण्याचे काम बाकी आहे. पुलाची सुरक्षा भिंत व इतर किरकोळ काम वेगाने सुरू आहेत.

पुलाचे काम पूर्ण हाेण्यासाठी आम्ही सातत्याने महापालिकेकडे पाठपुरावा केला. रेल्वे गेट बंद झाल्यावर स्थानिक नागरिक, नोकरदार आणि शाळेत जाणाऱ्या मुलांची गैरसोय होत होती. मात्र, आता हा पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार असल्याने विद्यार्थी आणि नगारिकांची गैरसोय दूर होणार आहे.
- अतुल कवडे सामाजिक कार्यकर्ते, घोरपडी
पुलाच्या कामासाठी रेल्वेलाईनच्या वरील बाजूस गर्डर टाकण्यात येणार आहे. तो साडेपाचशे टनाचा आहे. मात्र, या ठिकाणी रेल्वेगाड्या सतत ये-जा करत असतात. गर्डर टाकताना रेल्वे थांबविण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून ब्लॉक घ्यावे लागणार आहेत. हा पूल पुढील दोन महिन्यांत वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे.
- दिनकर गोजारे, मुख्य अभियंता प्रकल्प विभाग, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT