प्रसाद जगताप
पुणे : घरातून ऑनलाईन शिकाऊ परवाना परीक्षा देत असताना, फेस नॉट मॅच, इतर घरातील आवाज, घरातील प्रकाश योजना आणि अर्जदाराच्या छोट्या-छोट्या हालचाली यांसारख्या अनेक समस्यांमुळे अर्जदाराची ऑनलाईन परीक्षाच ग्राह्य धरली जात नाही. त्यांना दुरुस्तीसाठी थेट आरटीओ कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत.
ऑनलाईन शिकाऊ परवान्याची परीक्षा देताना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. घरातून शिकाऊ परवाना काढताना आता नव्या नियमावलीनुसार वेबकॅमेरा आवश्यक करण्यात आला आहे. यात अर्जदाराचा आधारकार्डवर दाढी नसलेला फोटो आणि शिकाऊ परवाना परीक्षा देताना त्या व्यक्तीला दाढी असेल, तर ती व्यक्ती मॅच होत नाही, असे सांगून संगणक प्रणाली ऑनलाईन अर्जच ग्राह्य धरत नाही. त्यासोबतच परीक्षा देताना अर्जदाराने काही हालचाली केल्या, तरी त्यांचा अर्ज ग्राह्य धरला जात नाही.
घरामध्ये प्रकाश व्यवस्था व्यवस्थित नसेल, आजूबाजूचे आवाज येत असतील किंवा परीक्षा देताना एखादी घरातील व्यक्ती चुकून अर्जदाराच्या मागून गेली तरीही त्या अर्जदाराचा अर्ज ग्राह्य धरला जात नाही. त्यांना थेट 'आरटीओ कार्यालयात भेट द्या', अशा स्वरूपाचा मॅसेज संगणकावर येत आहे. त्यामुळे आरटीओकडून घरबसल्या दिल्या जाणार्या परवान्यासाठी नागरिकांना आता थेट आरटीओ कार्यालयात शिकाऊ परवान्याच्या दुरुस्तीसाठी जावे लागत आहे.
ही नवीन वेबकॅमेर्याची यंत्रणा 20 डिसेंबर 2022 पासून सुरू झाली असून, आतापर्यंत सुमारे 30 ते 40 जणांना थेट आरटीओ कार्यालयात येऊन दुरुस्ती करावी लागली आहे. त्यामुळे आरटीओ प्रशासनाने यात लक्ष घालून या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी होत आहे.
या सूचनांचे करा पालन…
सुरुवातीला घरातील प्रकाश व्यवस्था चांगली करावी
आजूबाजूला कोणालाही थांबू देऊ नका
इतर आवाज येणार नाहीत, अशा ठिकाणी बसा
तुमचा आवाज स्पष्ट येईल, अशी व्यवस्था करा
परीक्षा सुरू झाल्यावर अर्जदाराने सातत्याने कॅमेर्याकडे लक्ष द्यावे, इतरत्र पाहू नये
अर्जदाराने परीक्षा देताना इतर हालचाली थांबवाव्यात
संगणकावर दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे
शिकाऊ परवाना घरबसल्या काढायचा असेल, तर गेल्या 20 तारखेपासून वेब कॅमेरा सिस्टीम (फेसलेस) वरिष्ठ पातळीवरील यंत्रणेकडून बंधनकारक केली आहे. ही नवीन यंत्रणा आहे. त्यामुळे सुरुवातीला नागरिकांना समस्या या येणारच आहेत. त्या सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून, नागरिकांनी ऑनलाईन परीक्षा देण्यापूर्वी संगणकावर येणार्या सूचनांचे योग्य ते पालन करावे.
राकेश रवींद्र मठ, सहा. मोटार वाहन निरीक्षक, (लायसन्स विभाग) आरटीओ, पुणे
शिकाऊ परवाना काढताना आलेल्या नव्या वेब कॅमेरा प्रणालीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. आमच्या चालकांनाही यामुळे परवाने काढताना अडचणी येत असून, अशा अडचणींमुळे आम्ही कधी चालकांना प्रशिक्षण देणार, असा प्रश्न सध्या आमच्यासमोर उभा राहिला आहे.
महेश शिळीमकर, महाराष्ट्र उपाध्यक्ष, म. राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटना
आरटीओतील गर्दी कमी करण्यासाठी अनेक कामे ऑनलाईन करण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांना फायदा होत आहे. परंतु, शिकाऊ परवान्यासाठी नुकत्याच सुरू झालेल्या वेब कॅमेर्याच्या प्रणालीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. अर्जच ग्राह्य धरला जात नसल्यामुळे नागरिकांना घरबसल्या परीक्षा देऊनही आरटीओत चकरा माराव्या लागत आहेत. आरटीओ कार्यालयातील गर्दी विनाकारण वाढत आहे.
एकनाथ ढोले, अध्यक्ष, सत्यसेवा वाहतूक संघ