पुणे

पुणे : तिशीपूर्वी ‘एचपीव्ही’ घ्या; तिशीनंतर एलबीसी तपासणी करा

अमृता चौगुले

प्रज्ञा केळकर-सिंग : 

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लैंगिक संबंध न आलेल्या आणि लग्न न झालेल्या प्रत्येक तरुणीने, स्त्रीने एचपीव्ही लस घ्यावी, असा सल्ला स्त्रीरोगतज्ज्ञांनी दिला आहे. विवाहित महिलांनी दर वर्षी लिक्विड बेस्ड सायटॉलॉजी अर्थात एलबीसी आणि दर पाच वर्षांनी एचपीव्ही तपासणी करून घ्यावी, ही महत्त्वाची बाब अधोरेखित करण्यात आली आहे. भारतीय महिलांमध्ये स्तन कर्करोगानंतर महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाणात गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचे अर्थात सर्व्हायकल कॅन्सरचे प्रमाण जास्त आहे. गर्भाशयमुखातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे कर्करोगाचा धोका उद्भवतो.

असुरक्षित लैंगिक संबंध, एकाधिक लैंगिक भागीदार, लैंगिक संक्रमणातून होणारे आजार, गर्भनिरोधक गोळ्यांचा दीर्घकालीन वापर, धूम—पान ही सर्व्हायकल कॅन्सरची प्रमुख कारणे आहेत, असे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनुजा पाटील यांनी सांगितले. वयात येणार्‍या मुलींना एचपीव्ही लसीचे दोन डोस आणि पंधराव्या वर्षांनंतरच्या मुलींना लसींचे तीन डोस दिले जावेत, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. विवाह होण्यापूर्वी किंवा लैंगिक संबंध प्रस्थापित होण्यापूर्वी एचपीव्हीची लस घेतल्यास अधिक परिणामकारक ठरते. एकाधिक लैंगिक भागीदार असलेल्या महिलांनी कधीही लस घेतली, तरी परिणामकारक ठरू शकते. तिशीनंतर विवाह झाला असेल आणि एक-दोनदाच लैंगिक संबंध आले असतील, तर अशा स्त्रियांमध्ये लसीची परिणामकारकता 30-40 टक्के असते, अशी माहिती स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी यांनी दिली. सध्या एचपीव्ही लसीची किंमत साडेतीन ते चार हजार रुपये इतकी आहे. सीरमची लस बाजारात आल्यावर त्याची किंमत 300 ते 400 रुपये इतकी असेल.

ससूनमध्ये वर्षभरात 211 कर्करोग रुग्णांवर उपचार

ससून रुग्णालयात 117 महिला रुग्णांच्या स्तनांच्या कॅन्सरच्या गाठी काढण्यात आल्या, तर 44 रुग्णांच्या तोंडाच्या शस्त्रक्रिया केल्या गेल्या. त्यापाठोपाठ 37 आतड्यांच्या कॅन्सरच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या आहेत. यावरून आतड्यांच्या कॅन्सरचेही प्रमाण बरेच दिसून येते. तसेच, 8 रुग्णांना किडनीचा तर 5 जणांना पित्ताशयाच्या पिशवीचा कॅन्सर असून, त्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. रुग्णालयात वर्षभरात 211 कॅन्सरच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

स्थूलता, बदलती जीवनशैली, आनुवंशिकता, प्लास्टिकचा अतिरिक्त वापर, अशा विविध कारणांमुळे स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. आपल्या कुटुंबातील स्त्रीला ज्या वयात स्तनांचा कर्करोग झाला असेल, त्या वयात आपण पोहचण्याच्या पाच वर्षे आधीपासूनच नियमित तपासणी आवश्यक असते. मासिक पाळी येऊन गेल्यावर दर महिन्याला 'सेल्फ ब—ेस्ट एक्झामिनेशन' करावे. वयाच्या चाळिशीनंतर मॅमोग्राफी दर पाच वर्षांनी करावी. कुटुंबात कर्करोगाचा इतिहास असल्यास 'ब—ाका' नावाची तपासणी करून आपल्यामध्ये स्तनांचा कर्करोग आनुवंशिकतेने आला आहे का? हे तपासता येते.
डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी, स्त्रीरोगतज्ज्ञ

कधी आणि कोणती तपासणी करावी?
गर्भाशयमुखाच्या कर्करोगासाठी सामान्यत: पॅप स्मीअर ही तपासणी केली जाते. तिशी-पस्तिशीनंतर दर वर्षी तपासणी करून घ्यावी. लिक्विड बेस्ड सायटॉलॉजी ही तपासणी अधिक परिणामकारक मानली जाते. योनीमार्गातून गर्भपिशवीची तपासणी यामध्ये केली जाते. ही तपासणी दर वर्षी केल्याने कर्करोग उद्भवला असल्याचे लवकरात लवकर निदान होऊ शकते. एचपीव्ही तपासणी दर पाच वर्षांनी करावी.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT