मंचर: शेतकर्यांना स्मार्ट होण्याच्या दृष्टीने सरकार नवनवीन आधुनिक तंत्र वापरात आणत आहे. आता नव्याने अॅग्रिस्टॅक प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. शासकीय लाभासाठी फार्मर आयडी काढून घेणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, फार्मर आयडी काढा अन् स्मार्ट शेतकरी व्हा, असे आवाहन मंचर (ता. आंबेगाव) येथील उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी केले.
तहसीलदार संजय नागटिळक यांच्या आदेशानुसार आंबेगाव तालुक्यात अॅग्रिस्टॅक प्रकल्प सुरू केला आहे. तालुक्यात एकूण खातेदार 88 हजार 419 इतके असून, त्यापैकी लाभार्थी 33 हजार 608 झाले आहेत.
अॅग्रिस्टॅक प्रकल्पांतर्गत आत्तापर्यंत 40 टक्के शेतकर्यांनी फार्मर आयडी काढून घेतलेले आहेत. इतर शेतकर्यांनीसुद्धा फार्मर आयडी काढावे आणि स्मार्ट शेतकरी होऊन विविध लाभ घ्यावेत, असे आवाहन तहसीलदार नागटिळक यांनी केले आहे.
अॅग्रिस्टॅक प्रकल्प शासकीय लाभासाठी फार्मर आयडी काढून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी आंबेगाव, जुन्नर तालुक्यांत बैठका घेऊन वेळोवेळी सूचना दिल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार डॉ. सचिन वाघ यांनी दिली आहे.
अॅपवरही करू शकता ई-पीक पाहणी
शेतकर्यांनी स्वतः अथवा सहायकाने शेतातल्या पिकांची नोंद ऑनलाइन पद्धतीने सातबारा उतार्यावर नोंदविणे यालाच ई-पीक पाहणी असे म्हटले जाते. गेल्या 4 वर्षांपासून महाराष्ट्र सरकार हा उपक्रम राबवत आहे. पिकांची नोंद करण्यासाठी सगळ्यात आधी ई-पीक पाहणी हे अॅप डाऊनलोड करावे लागते. त्यासाठी प्लेस्टोअरवर जाऊन ई-पीक असे सर्च करावे. त्यानंतर इन्स्टॉलवर क्लिक करून टप्प्याटप्प्याने पुढील नोंदी कराव्यात, असे तालुका कृषी अधिकारी सिद्धार्थ ढवळे यांनी सांगितले.
आंबेगाव जिल्ह्यात सध्या ई-पीक पाहणी, अॅग्रिस्टॅक आदी कामांची लगबग पाहायला मिळत आहे. उपविभागीय अधिकारी शिंदे हे शेतकर्यांच्या हितासाठी नेहमी दक्ष असतात. शेतकर्यांना वेळेवर बी-बियाणे, खते मिळावीत, अनुदान रकमा वेळेत प्राप्त व्हाव्यात, विविध योजनांचे लाभ मिळावेत, यासाठी ते कृषी विभाग, पंचायत विभाग, महसूल विभागाचा आढावा घेत असतात.- सचिन मुंडे, नायब तहसीलदार, प्रांत कार्यालय, मंचर