पुणे

पुणे : बीजे महाविद्यालयात होणार ’एच3 एन2’चे जिनोम सीक्वेन्सिंग

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  'एच3एन2'च्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल होणार्‍या आणि आयसीयूमध्ये हलवाव्या लागणार्‍या रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाला पत्र लिहून 'एच3एन2'चे जिनोम सीक्वेन्सिंगची परवानगी मागितली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीव्यतिरिक्त 'एच3एन2' च्या नमुन्यांची चाचणी घेणार्‍या अनेक प्रयोगशाळा आहेत. परंतु, या प्रयोगशाळांमध्ये जिनोम सीक्वेन्सिंग केले जात नाही. बीजे मेडिकल कॉलेजला परवानगी मिळाल्यास स्ट्रेनमधील उत्परिवर्तन, संसर्गाची तीव—ता ओळखण्यास मदत होईल.

बीजे मेडिकल कॉलेज आणि ससूनच्या मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते म्हणाले, 'आम्ही वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाला (डीएमईआर) पत्र लिहून ससूनमधील रुग्णांचे जिनोम सीक्वेन्सिंग करण्याची परवानगी मागितली आहे. आम्ही पहिल्यांदाच 'एच3एन2' नमुन्यांचे सीक्वेन्सिंग करणार आहोत. कोरोना विषाणूसाठी वापरण्यात आलेली यंत्रणा एच3एन2 सीक्वेन्सिंगसाठी वापरण्यात येणार आहे.'

मान्यता मिळाल्यास 'एच3एन2'चे जिनोम सीक्वेन्सिंग करणारे बीजे हे पहिले वैद्यकीय महाविद्यालय असेल. कोविड-19 दरम्यान उत्परिवर्तन ओळखण्यात बीजेच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. जानेवारीपासून बीजे मेडिकल कॉलेजमध्ये ससूनमधील रुग्णांच्या नमुन्यांची 'एच3एन2'साठी तपासणी केली जात आहे.
– डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता

SCROLL FOR NEXT