वडगाव मावळ; पुढारी वृत्तसेवा : गेल्या तीन वर्षांपासून न्याय मिळण्यासाठी झगडणार्या जनरल मोटर्सच्या कामगारांनी अखेर सोमवारी गांधी जयंतीचे औचित्य साधून वडगाव मावळ येथे कुटुंबासह ठिय्या मांडून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले. दरम्यान, 10 ऑक्टोबरपर्यंत राज्य सरकारने प्रश्न सोडवला नाही तर 11 ऑक्टोबरला एमआयडीसी बंद पाडू, असा इशारा दिला आहे.
जनरल मोटर्सच्या जागी सरकार एक नामांकित कंपनी आणणार असेल तर तिथे जनरल मोटर्समधील एक हजार कामगारांना त्या कंपनीत कामाला घ्यावे, हे मान्य न केल्यास सरकारने त्यांना कंपनीला परवानगी देऊ नये, कंपनीला रेड कार्पेट टाकणार्या सरकारने कामगारांचा ही विचार करावा या मागण्यांसाठी जनरल मोटर्सचे कामगार तीन वर्षांपासून संघर्ष करत आहेत. परंतु, अद्याप त्यांना न्याय मिळालेला नाही. यासंदर्भात आमदार शेळके यांनी पावसाळी अधिवेशनातही आवाज उठविला होता.
राज्य सरकार दखल घेत नसल्याने अखेर आज महाराष्ट्र राज्य कामगार कृती समिती व श्रमिक एकता महासंघाच्या मार्गदर्शनाखाली कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप भेगडे, सचिव राजेंद्र पाटील, पदाधिकारी अमोल खाडे, प्रकाश टिळेकर, प्रवीण फरगडे, अमोल ढोले, प्रमोद साळवी, चंद्रकांत अळसुंदकर यांच्यासह कामगारांनी आज सकाळीच कुटुंबासह ठिय्या मांडून बेमुदत साखळी उपोषण
सुरू केले.
दरम्यान आंदोलनस्थळी भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, राष्ट्रवादीचे जिल्हा
वरिष्ठ उपाध्यक्ष किशोर भेगडे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर, माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे, राजेंद्र जांभुळकर आदींनी भेट देऊन पाठिंबा दिला.
आमदार शेळके यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला व जनरल मोटर्सच्या कामगारांचा प्रश्न सरकार गांभीर्यानं घेतला नाही, अशी कबुली शेळकेंनी जाहीरपणे दिली. तसेच, सत्तेत असलो तरी सरकारची बाजू घेणार नाही. सरकारने वस्तुस्थिती स्वीकारायला हवी. आमचा येथे येणार्या कंपनीला विरोध नाही, पण स्थानिक भूमिपुत्र आणि कामगारांचे प्रश्न जोपर्यंत मिटत नाहीत, तोपर्यंत कंपनीत कोणतंही काम करू देणार नाही, असा इशारा आमदार शेळके यांनी दिला. 10 ऑक्टोबरपर्यंत सरकारने निर्णय न घेतल्यास 11 ऑक्टोबरला तळेगाव एमआयडीसी ठप्प करू, भले कंपन्या स्थलांतरित झाल्या तरी आम्ही त्याची पर्वा करणार नाही, असा इशाराही दिला आहे.
हेही वाचा