तळेगाव ढमढेरे : पुढारी वृत्तसेवा : शिक्रापूर नजीक कासारी फाटा-तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) रस्त्यावर मंगळवारी (दि. 13) रात्री उशिरा गॅस वाहून नेणारा टँकर रस्त्याच्या कडेला खड्ड्यात उलटला. या अपघातात गॅसगळती झाली. चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, चालक गंभीर जखमी झाला आहे. शिवकुमार यादव (वय 36, रा. दुबेपूर, ता. भरथीपूर, जि. जौनपूर, उत्तर प्रदेश) असे जखमी झालेल्या टँकरचालकाचे नाव आहे. मंगळवारी रात्री उशिरा गॅस वाहून नेणारा टँकर (एमएच 12 एलटी 2851) हा तळेगाव ढमढेरे बाजूकडे जात होता. शिक्रापूर नजीक कासारी फाटा-तळेगाव ढमढेरे रस्त्यावरील वळणाचा अंदाज न आल्याने टँकर रस्त्याच्या कडेला खड्ड्यात उलटला.
यामध्ये टँकरची टाकी एका बाजूला व मुख्य भाग एका बाजूला झालाय. त्यात टँकरचालक शिवकुमार बाहेर फेकला गेल्याने गंभीर जखमी झाला. टँकरच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे, पोलिस हवालदार शंकर साळुंके, संदीप कारंडे, संतोष मारकड, लखन शिरसकर आदींचे पथक घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांनी जखमी चालक शिवकुमारला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, पुणे महानगर विकास प्राधिकरण तसेच रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. टँकरमधून गॅसगळती होत असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली. मात्र, काही वेळाने गॅस कंपनीचे पथक त्या ठिकाणी येत त्यांनी खबरदारी घेत गॅसगळती बंद केली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.