वर्षा कांबळे
पिंपरी(पुणे): पिंपरी-चिंचवडची पूर्वीपासूनची ओळख कामगारनगरी व उद्योगनगरी म्हणून आहे. आता शहर स्मार्ट सिटी नावाने ओळखले जाते. शहराचा विकास होत असताना पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. सध्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत 190 उद्याने विकसित झाली असल्याने रखरखत्या उन्हात नागरिकांना उद्यानांची भुरळ पडत आहे. सकाळी तसेच सायंकाळी शहरातील उद्याने गर्दीने फुलून जात असल्याचे चित्र सध्या पहायवायस मिळत आहे.
1970 साली नगरपालिकेच्या काळात शहरात 30 उद्याने होती. 1982 साली 'पिंपरी-चिंचवड महापालिका' स्थापन करण्यात आली. शहराची झपाट्याने होणारी वाढ पाहता नागरिकांच्या गरजेनुसार उद्यानांची संख्या वाढवण्यात आली. पर्यावरणाचा समतोल राखणे आणि नागरिकांच्या मनोरंजनाबरोबरच शहराच्या सौंदर्यात भर घालण्याच्या उद्देशाने उद्याने विकसित करण्यात आली. त्यानुसार, सध्या 2023 पर्यंत उद्यानांची संख्या 190 झाली.
जशीजशी परिस्थिती बदलत आहे, तशा उद्यानांमध्ये सुविधाही देण्यात आल्या आहेत. नागरिकांना स्वच्छ हवेबरोबरच, जॉगिंग ट्रॅक, ओपन जीम, लहान मुलांसाठी पार्क अशा सुविधांवर भर देण्यात आला आहे. तसेच शोभिवंत वृक्षांखेरीस देशीवृक्ष आणि औषधी वृक्षांचे संगोपन केले जात आहे. तसेच महापालिकेने शहराच्याअंतर्गत भागांत मोकळी जागा, रस्ते, टेकड्या, नदी, नाले, शाळा, रुग्णालये, निवास क्षेत्र याठिकाणी वृक्षारोपण केले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने विकसित केलेल्या दुर्गादेवी टेकडी उद्यानात देशी वृक्ष लावण्यावर पालिकेने भर दिला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने विकसित केलेले चिंचवडमधील बर्ड व्हॅली उद्यान. थेरगाव येथील बोट क्लब उद्यान, चिंचवड येथील मोरया गोसावी उद्यान, आकुर्डीतील गणेश तलाव, पिंपळे गुरव येथील डायनोसॉर पार्क, भोसरीतील सहल केंद्र, प्राधिकरण संतनगर येथील 'नक्षत्र उद्यान', एमआयडीसी परिसरातील 'आयुर्वेदिक उद्यान' विकसित केले आहे.
या उद्यानात औषधी झाडे लावण्यात आली आहेत. टी ब्लॉक क्र. 47 या परिसरात जंगलातील झाडे आणि औषधी झाडांचे असे 'पर्यावरण संस्कार उद्यान' विकसित केले आहे. चिंचवड कृष्णानगर येथील खाणीमध्ये अटल बिहारी वाजपेयी उद्यान साकारले आहे.
शहरातील 'दुर्गादेवी टेकडी' फिरण्यासाठी नावाजलेले ठिकाण आहे. याठिकाणीच अप्पू घर असल्यामुळे बच्चे कंपनीचीदेखील सोय होते. दररोज सकाळी शेकडोंच्या संख्येने याठिकाणी नागरिक फिरायला येतात. तसेच दिवसभरदेखील नागरिकांची टेकडीवर फिरण्यास गर्दी असते. याठिकाणी विविध प्रकारची देशी झाडे आणि पक्ष्यांचा अधिवास आहे.
संभाजीनगर येथील बर्ड व्हॅली याठिकाणीदेखील नयनरम्य परिसरामुळे याठिकाणी नागरिकांची गर्दी असते. पाण्याचा तलाव आणि त्याठिकाणी साकारलेला मानवी मुखवट्यातील धबधबा हा नागरिकांचे आकर्षण ठरतो. बहुतांश नागरिक फोटोसेशनसाठीदेखील याठिकाणी येतात.
भोसरी सहल केंद्रामध्ये शहरातील शाळा प्रामुख्याने भेट देतात. याठिकाणीदेखील देशी वृक्ष मोठ्या प्रमाणात पहावयास मिळतात. लहान मुलांसाठी याठिकाणी झुकझुक गाडीदेखील आहे. याठिकाणी प्री वेडिंग शूट व फोटोसेशनदेखील करण्यात येते.
याठिकाणी केजुबाई बंधारा व बोट क्लब असल्याने नागरिकांची याठिकाणाला पसंती आहे. याठिकाणी आर्टिफिशिअल धबधबा असून अंतराअंतरावर कृत्रिम भूछत्रांची निर्मिती केली आहे. याठिकाणी मनोरे तयार करण्यात आले आहे. ज्यावर नागरिक उंचावरून उद्यानाला पाहू शकतात. जवळच असलेल्या बोट क्लबमध्ये बोटींगचा आनंददेखील घेऊ शकतात.