पाटस, पुढारी वृत्तसेवा: पाटस (ता. दौंड) येथे कच-याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. कचरा व पावसाचे पाणी यातून निर्माण होणारे वायूप्रदूषण व पाणी प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. कचरा समस्या ग्रामपंचायतला संपुष्टात आणता येत नसल्याने ग्रामस्थ नाराजी व्यक्त करीत आहेत. गावतलाव, तामखडा रोड, उड्डाण पूल, एसटी मैदान, स्मशानभूमी, बाजारतळ, ग्रामपंचायत डोंगेश्वर या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा आणून टाकला जात आहे. पाटस गावची बाजारपेठ मोठी आहे. किराणा, हॉटेल, चहा टपर्या, स्वीट होम, कापड दुकाने, बेकरी अशी विविध दुकाने गावात असल्याने दररोज निघणारा कचरा कोठे टाकायचा हा प्रश्न व्यावसायिकांना पडला आहे. जागाच नसल्याने हव्या त्याठिकाणी, मिळेल तेथे कचरा टाकला जात आहे. परिणामी पाऊस पडल्यांनतर त्याचा उग्र असा वास निर्माण होऊन नागरिकांना त्रासदायक ठरत आहे.
व्यावसायिकदृष्टया व परिसरात आलेल्या कंपनीमुळे गावची लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे. परिणामी दिवसेंदिवस कचर्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पाटस गावाचा कचराप्रश्न गंभीर विषय बनला आहे. मात्र, याकडे ग्रामपंचायत पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. पाटस येथील गावतलावालगतच रस्त्याच्याकडेला मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यावसायिक व रहिवासी लोक कचरा आणून टाकतात. पाणी व कचरा यांच्या मिश्रणातून निर्माण होणार्या दुर्गंधीचा सामना विद्यार्थांना व नागरिकांना होतो. कचर्याची ग्रामपंचायतीकडून व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.
पाटस ग्रामपंचायतीकडे हॉटेल, व्यावसायिक व काही रहिवासी लोकांच्या कचरा निवारण्याची यंत्रणा नसल्याचे दिसून येत आहे. कचर्याचा एक गंभीर प्रश्न पाटस गावासाठी बनल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ग्रामपंचायतीकडे एक घंटागाडी आहे. या गाडीवरचा आवाज लोकांपर्यंत पोहचत नाही व कधी गाडी येऊन गेली हेही लोकांना कळत नसल्याने त्या गाडीचा कामाचा वेग वाढला आहे का असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. दैनंदिन निघणारा कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडीच्या संख्येत वाढ करावी व सार्वजनिक ठिकाणच्या कचर्याची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी व नागरिकांना होणारा त्रास कायमचा दूर करून पाटस गावचा भविष्यात उदभवणार आरोग्याचा प्रश्नही संपुष्टात आणावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.