पुणे: सकाळचे साडेसात वाजलेले... वानवडीतील ऑक्सफोर्ड व्हिलेजजवळ कचर्याचा साचलेला ढीग अन् तो कचरा उचलणारे सफाई कर्मचारी... हे चित्र वानवडीतील बर्याच ठिकाणी पाहायला मिळाले. परिसरातील स्थानिक नागरिक रस्त्यावरच कचरा फेकतात. त्यामुळे कचर्याचा मोठा ढीग ठीकठिकाणी साचतो.
हा साठलेला कचरा सकाळी महापालिकेच्या सफाई कर्मचार्यांमार्फत उचलला जातोच; परंतु हे सफाईचे चित्र काही तासांचेच असते. कारण, त्यानंतर पुन्हा नागरिक येथे कचरा आणून टाकतात अन् पुन्हा कचर्याचे ढीग साचतात. (Latest Pune News)
वानवडी आणि फातिमानगर भागात कर्मचार्यांकडून साफसफाई केल्यानंतरही नागरिकांकडून पुन्हा कचरा फेकला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दै. ’पुढारी’ने या भागाची पाहणी केली असता हे चित्र दिसून आले. वानवडी आणि फातिमानगर भागामध्ये अनेक रहिवासी सोसायट्या आहेत.
या सोसायट्यांमधून सकाळी स्वच्छता कर्मचारी कचरा गोळा करताना दिसले आणि सोसायट्यांच्या अंतर्गत भागातील रस्ते सकाळी साफ करण्यात येत होते. त्यानंतर काही रस्त्यांच्या कडेला नागरिकांनी टाकलेला ढीगभर कचराही उचलण्यात आला. पण, पुन्हा दुपारच्या वेळेस या ठिकाणी कचरा साचायला सुरुवात झाली. पालिकेच्या कर्मचार्यांकडून परिसर स्वच्छ केला जात आहे. पण, नागरिकांकडून नियम पाळले जात नसल्याचे चित्र येथे आहे.
ऑक्सफोर्ड व्हिलेज येथे तर कचर्याचा ढीग साचत आहेच... पण, संविधान चौकातही काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला नागरिक रात्री कचरा टाकत असून, तो साफही केला जात आहे. पण, काही तासांमध्ये पुन्हा परिस्थिती जैसे थेच होत असल्याचे दिसून आले, तर वानवडी गावठाण परिसरात एका ठिकाणी तर इतका कचरा साचला आहे की दुर्गंधीमुळे येथून वाहनचालकांचे येणे-जाणेही कठीण झाले आहे. बर्याच काळापासून येथील कचरा उचलला गेला नसून, येथील कचरा लवकरात लवकर उचलण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
साळुंखे विहार रस्त्यावर जिथे भाजीविक्रीचे स्टॉल लागतात त्या ठिकाणी पूर्वी भाजीविक्रेते एका ठिकाणी कचरा टाकायचे. पण, आता येथे रात्री घनकचरा विभागाची गाडी फिरत असल्यामुळे व्यावसायिकांचे येथे कचरा टाकणे थांबले आहे. हे चित्र आहे वानवडीचे. फातिमानगर येथेही अशीच काहीशी स्थिती असली, तरी स्वच्छता कर्मचार्यांकडून वेळेवर कचरा उचलला जात आहे.
आम्ही वानवडी भागात काम करतो. सकाळी सोसायट्यांमध्ये जाऊन कचरा गोळा करतोच. पण, रस्त्याच्या कडेला काही ठिकाणी नागरिक कचरा फेकत असल्याने तोही गोळा करावा लागतो. नागरिक वारंवार कचरा आणून टाकतात. आम्ही वारंवार कचरा उचलतो. नागरिकांनीही स्वच्छतेचा विचार करून शिस्त पाळली पाहिजे. कचरा रस्त्यावर टाकू नये.- गुलाब कांबळे, स्वच्छता कर्मचारी