Saswad garbage issue pudhari
पुणे

Saswad garbage issue: सासवड-सोनोरी रस्त्यावर वाढती अस्वच्छता; उघड्यावरील कचऱ्यामुळे दुर्गंधी

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर; कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

सासवड: पुरंदर तालुक्यातील सासवड-सोनोरी रस्त्यालगत वाढत्या अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा साचत असून, दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः सासवड बायपास परिसरात उघड्यावर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे घाणीचे सामाज्य निर्माण झाले आहे.

जयदीप मंगल कार्यालय ते सासवड-पुणे रस्त्याला जोडणाऱ्या माउली सोसायटी आणि व्यंकटेश्वरा सोसायटीमार्गे जाणाऱ्या रस्त्यावर काही नागरिकांकडून सर्रास कचरा टाकला जात असल्याचे दिसून येत आहे.

Otur climate change: वृक्षतोडीमुळे ओतूरचा हरवत चालला गारवा; वाढते तापमान, आटणाऱ्या नद्या अन्‌‍ बदलते हवामान चिंतेचा विषयमागील काही दिवसांपासून या परिसरात विक्रीसाठी कापलेल्या कोंबड्यांचे टाकाऊ अवयव, हॉटेलमधील शिल्लक अन्न तसेच घरगुती कचरा उघड्यावर फेकण्यात येत आहे. त्यामुळे परिसरात तीव दुर्गंधी पसरली असून, अस्वच्छता वाढली आहे.

नगरपरिषदेची घंटागाडी नियमितपणे घरोघरी येत असतानाही काही नागरिकांकडून रस्त्यावरच कचरा टाकण्याचे प्रकार सुरू असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

समारंभातील उरलेले अन्न, पत्रावळ्या, जुने कपडे, बॅगा आणि तुटलेल्या चपला उघड्यावर टाकल्या जात असल्याने परिसरात भटक्या कुत्र्यांच्याही वावर वाढला आहे. याचा त्रास विशेषतः शालेय विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत आहे.

परिसरातील नागरिकांनी या प्रकाराबाबत सासवड नगरपरिषदेकडे तक्रार करून तातडीने कचरा हटविण्याची मागणी केली आहे. तसेच रात्रीच्या वेळी कचरा टाकणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, सासवड नगरपरिषदेकडून स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. ‌’उघड्यावर कचरा टाकू नका‌’ असे फलक आणि बॅनर शहरातील विविध ठिकाणी लावले आहेत. मात्र, काही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

नगरपरिषदेच्या वतीने जनजागृती, प्रचार आणि प्रबोधन केले जात आहे. उघड्यावर कचरा टाकू नये, यासाठी शहरात विविध ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. तरीही काही सोसायट्यांमधील नागरिकांकडून उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रकार होत आहेत. अशा व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
- डॉ. कैलास चव्हाण, मुख्याधिकारी, सासवड नगरपरिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT