पुणे

कचरा, राडारोडा अन् अतिक्रमणे ; मुठा कालवा रस्ता समस्यांच्या विळख्यात

अमृता चौगुले

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : खडकवासला धरणाच्या मुठा कालवा रस्त्यावर खडकवासला, नांदेड फाटा, धायरी फाटा ते वडगावपर्यंत कचरा, राडारोडा साचल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच या रस्त्यासह कालवा परिसर ठिकठिकाणी अतिक्रमणांच्या विळख्यात अडकला असून, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्यापासून खडकवासला धरणापर्यंतच्या कालवा रस्त्याची स्थिती सध्या गंभीर झाली आहे.

जुन्या बांधकामाच्या दगड, विटा, राडारोडा, टाकाऊ फर्निचर, लाकडे, फरशी आदीचे ढीग या रस्त्यावर लागल्याचे दिसून येत आहे. कालव्यातील बंदिस्त जलवाहिनीलगत सडलेले मांस, विषारी-रासायनिक पदार्थ, काचा आदींचा खच पडला आहे. झाडीझुडपे, दलदल वाढल्याने परिसरातील जलवाहिन्यांना धोका निर्माण झाला आहे. याकडे खडकवासला भाजपचे उपाध्यक्ष रूपेश घुले व किरकटवाडी शक्ती केंद्राचे अध्यक्ष सुनील हगवणे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

कालवा परिसरात कचरा दर आठवड्याला उचलून नेला जात आहे. फलक लावूनही नागरिक या ठिकाणी कचरा राडारोडा टाकत आहे. याला प्रतिबंध करण्यासाठी लोखंडी जाळ्या बसविण्याबाबत वरिष्ठ पातळीवर कार्यवाही सुरू आहे.
                    – अजय जगधने, आरोग्य निरीक्षक, सिंहगड क्षेत्रीय कार्यालय

बंदिस्त जलवाहिनी टाकण्याअगोदर दोन्ही कालव्याच्या तीरावरील रस्ते सुस्थितीत होते. अतिक्रमणे, कचरा, राडारोडा नव्हता. अलीकडच्या काळात वाढत्या नागरीकरणामुळे कालव्याच्या रस्त्यावर राडारोडा, कचरा वाढला आहेत. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे कालवा, तसेच बंदिस्त जलवाहिनी कुमकुम होण्याची शक्यता आहे.
                                       – रूपेश घुले, उपाध्यक्ष,खडकवासला भाजप

महापालिकेने जुन्या मुठा कालव्यात जलवाहिनी टाकली आहे. तेव्हापासून तो कालवा व लगतचा रस्ता वापरण्यासाठी महापालिकेला दिला आहे. यामुळे या परिसराच्या स्वच्छतेची जबाबदारी महापालिकेची आहे. कालव्यावरील अतिक्रमणे, राडारोड्याची पाहणी करण्याच्या सूचना शाखा अभियंत्याला दिल्या असून, संबंधितांना नोटिसा देऊन लवकरच कारवाई करण्यात येणार आहे.
    – मोहन भदाणे, उपविभागीय अभियंता, खडकवासला जलसंपदा विभाग

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT